Breaking News

लोकसभा निवडणूक 2024: ठाकरे – शाह भेटीने राज्याचे वारे बदलणार ?

लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच राज्याच्या राजकारणात वाऱ्याच्या वेगाप्रमाणे घटना घडताना दिसून येत आहेत. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे मनसे दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी या तीनपैकी दोन मतदारसंघांमध्ये निवडणूक लढणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत.

राज्यात इंडिया आघाडी आणि महायुती दोघांनी कंबर कसली आहे. पक्षातील अंतर्गत फुटीमुळे यंदाची लोकसभा निवडणूक ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्वाची आहे. दोन्ही पक्षांना नवीन पक्ष चिन्ह आणि नाव मिळाले असून यंदा निवडणुकीत एकाच पक्षाचे लोक एकमेकांच्या विरोधात लढतील. याचबरोबर भाजप, काँग्रेस, मनसे अशा इतर पक्षांसाठी देखील ही निवडणूक महत्वाची आहेच. राज्यातील राजकारणात मनसेची एकला चलो भूमिका बदलली आणि मनसे महायुतीत शामिल झाली तर मराठी मते विभागून महायुतीला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला याचा तोटा निर्माण होणार असल्याचे म्हंटले जात आहे. एकूणच या निवडणुकांनंतर राजकीय वारे बदलण्याची चर्चा सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात होत आहे.

नेमके काय घडले ?

शाह-राज यांची बैठक दुपारी साडेबारा वाजता सुरू होऊन अर्ध्या तासात संपली. शाह यांच्या भेटीपूर्वी राज यांची ताज मानसिंह हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर ते शाह यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर राज व अमित ठाकरे लगेच मुंबईला रवाना झाले.

एक ते दोन दिवसांत येईल अधिक स्पष्टता

अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यात झालेली चर्चा सकारात्मक होती. मनसेला किती जागांची अपेक्षा आहे हे राज यांनी स्पष्ट केले आहे. येत्या एक ते दोन दिवसांत याबाबत अधिक स्पष्टता येईल, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांना सांगितले. राज यांनी आता २१ मार्चला मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली असून या बैठकीनंतर मनसेची पुढची रणनीती आणखी स्पष्ट होणार आहे. दिल्लीवारीनंतर राज ठाकरे मंगळवारी संध्याकाळी मुंबईत परतले. यानंतर त्यांनी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दक्षिण मुंबईतून तुमची उमेदवारी निश्चित झाली का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, राज मला म्हणाले की गडचिरोलीतून लढ तर त्यालाही माझी तयारी आहे. कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला नाही याचा निर्णय पक्षप्रमुख घेत असतात.

संजय राऊत काय म्हणाले ?

राज ठाकरे भाजपसोबत गेल्याने आमच्या शिवसेनेवर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही. मराठी मतांचे विभाजन करून त्याचा फायदा उचलण्याची भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची नेहमीच नीती राहिली आहे. त्याला काही नेते बळी पडत आहेत, पण मतदार बळी पडणार नाहीत.