Breaking News

लोकसभा निवडणूक २०२४ : राज्यात कोण येणार महायुती की महाआघाडी ?

राज्यातील ४८ मतदारसंघांसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत आहे. महायुतीमध्ये भाजपा (२८), शिवसेना (एकनाथ शिंदे) (१५) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) (१) आणि रासप (१) असे पक्ष एकत्र आहेत. तर महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव ठाकरे) (२१), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) (१०) आणि काँग्रेस (१७) पक्ष निवडणूक लढवत आहे.

एबीपी माझा-सी व्होटरच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, भाजपने लढवलेल्या एकूण २८ जागांपैकी १६ ते १८ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी होऊ शकतात. तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला ६ ते ८ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.

याउलट राज्यात काँग्रेसला ७ ते ९ जागांवर विजय मिळू शकतो. तर शरद पवार गट आणि ठाकरे गटाला १५ ते १७ जागांवर विजय मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे.

टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाला मिळून (महायुती) २६ जागांवर विजय मिळेल. तर काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मिळून (महाविकास आघाडी) २२ जागांवर विजय मिळेल. महाविकास आघाडीने दावा केला होता की, त्यांना राज्यात ३५+ जागा मिळतील. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेले दावे चुकीचे ठरतील असा अंदाज टाईम्स नाऊ-ईटीजीच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि संयुक्त शिवसेनेची (उद्धव ठाकरे) युती होती. तेव्हा या युतीने राज्यात ४१ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे टाईम्स नाऊचा अंदाज खरा ठरला तर राज्यात महायुतीचा ४४ ते ४५ टक्के जागांवर पराभव होईल.

इतर सर्वेक्षणांमधील आकडेवारी

इंडिया न्यूज डी डायनॅमिक्स
महायुती – ३४
मविआ – १३
अपक्ष – १

न्यूज २४ चाणक्य
महायुती – ३३
मविआ – १५

रिपब्लिक भारत-मॅट्रीझ
महायुती – ३० ते ३५
मविआ – १३ ते १९

रिपब्लिक PMARQ
महायुती – २९
मविआ – १९

टीव्ही ९ पोलस्ट्राट
महायुती – २२
मविआ – २६

एबीपी-सी व्होटर
महायुती – २४
मविआ – २३