kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘लाडकी बहीण’ला काँग्रेसचं ‘महालक्ष्मी योजने’ने उत्तर, महिन्याला 2 हजार देणार

राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्यातील महायुती सरकारकडून धडाडीने अनेक निर्णय घेतले जात आहेत. शिंदे सरकारने नुकतेच मुंबईच्या वेशीवरील पाच टोलनाक्यांवरील हलक्या वाहनांचा टोल माफ केला आहे. सरकारच्या या निर्णयाची सगळीकडे चर्चा होत असताना दुसरीकडे काँग्रेस पक्षातही राजधानी दिल्लीमध्ये जाहीरनाम्यावर खलबतं चालू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सरकार राज्यातील जनतेला अनेक मोठी आश्वासनं देणार असून यामध्ये महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला, महालक्ष्मी योजनेने उत्तर दिले जाणार आहे.

राजधानी दिल्लीत सध्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर चर्चा केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महिला, युवक, शेतकरी, कामगार, अनुसूचित जाती, जमाती अशा वेगवेगळ्या प्रवर्गासाठी काँग्रेस अनेक आकर्षक योजना लागू करण्याचे आश्वासन देणार आहे. विशेष म्हणजे या योजनांसाठी नावेदेखील ठरवण्यात आल्याचं म्हटलं जातंय. सध्याच्या महायुती सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची मदत दिली जाते. सरकारच्या या योजनेची सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे. हीच बाब लक्षात घेता काँग्रेस पक्षदेखील सत्तेत आल्यास राज्यातील महिलांना महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून प्रतिमहिना 2000 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या योजनेसाठी साधारण 60 हजार कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास, आम्ही कृषी समृद्धी शेतकरी सन्मान योजना लागू करू, असे आश्वासन काँग्रेस देण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंत कर्ज माफ केलं जाणार आहे. ही कर्जमाफी साधारण 28 हजार कोटींची असेल.

स्री सन्मान योजना

या योजनेअंतर्गत महिलांना बस वाहतूक सेवा पूर्णपणे मोफत चालवली जाण्याचे आश्वासन काँग्रेस देऊ शकते. या योजनेचा समावेश जाहीरनाम्यात केला जाऊ शकते. या योजनेसाठी 1 हजार 460 कोटीचा निधी अपेक्षित आहे.

सर्वांना 25 लाख रूपयांचं विमा कवच

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कुटुंब रक्षण योजनेचेही समावेश केला जाण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत सरकार आल्यास काँग्रेसतर्फे सर्वांना 25 लाख रूपयांचं विमा कवच दिलं जाऊ शकतं. या योजनेसाठी 6 हजार 556 कोटीचा निधी अपेक्षित आहे.

युवकांना हमी

युवकांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसतर्फे मोठी आश्वासनं दिली जाऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार बेरोजगारांना महिन्याला 4000 रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेस देऊ शकते. या योजनेअंतर्गत साधारण 6.5 लाख युवकांना हा भत्ता दिला जाण्याची शक्यता आहे.