राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. सत्ताधारी-विरोधकांदरम्यान होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांची वाढलेली तीव्रता आणि घोषणांचा पडणारा पाऊस ही निवडणुकांची ठरलेली नांदी. या धामधुमीत पुढील सप्टेंबर महिन्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वीच विधानसभा निवडणुकांची घोषणा करून निवडणूक प्रक्रिया सुरू करता येईल का, याची चाचपणी सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी ‘एचटी मराठी’ला दिली आहे. महाराष्ट्र विधानसभेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया, नवीन सरकारची स्थापना ही १० ऑक्टोबर २०२४ पूर्वी करता येईल का, याची सुद्धा चाचपणी सध्या केला जात आहे. या घडामोडींची माहिती मिळताच अनेक मंत्र्यांनी आपआपले मतदारसंघ गाठले असून मतदारांच्या भेटीगाठी, मतदारसंघात राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपत आहे. तत्पुर्वी हरियाणा विधानसभेची मुदत ३ नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार आहे. हरियाणानंतर महाराष्ट्र विधानसभेची मुदत २३ दिवसांच्या अंतराने संपते. त्यामुळे दोन्ही विधानसभांची नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे. २००९ पासून दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी होत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यास महाराष्ट्राची निवडणूक दीड महिनापूर्वी तर हरियाणाची विधानसभा निवडणूक प्रक्रिया २० दिवस आधीच पूर्ण होणार आहे. यापूर्वी १९९९ साली तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने तब्बल ६ महिने आधीच लोकसभेसोबत विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निवडणुकीच तत्कालीन शिवसेना-भाजप युतीचा पराभव झाला होता.

यंदा ६ ते १७ सप्टेंबर २०२४ दरम्यान गणेशोत्सव साजरा होणार आहे. १० ऑक्टोबर २०२४ पूर्वी निवडणूक प्रक्रिया संपवण्याचा योजना असल्यास किमान १५ सप्टेंबर २०२४ पूर्वी निवडणुकीची अधिसूचना काढणे आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी किंवा उत्सव सुरू झाल्यानंतर धामधुमीच्या काळातच विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पाडली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गणेशोत्सव संपताच निवडणूक प्रचार सुरू होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने २७ सप्टेंबर २०१९ रोजी निवडणूक अधिसूचना जारी केली होती. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०१९ ही होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ७ ऑक्टोबर २०१९ तर २१ ऑक्टोबर २०१९ रोजी राज्यात मतदान झाले होते. त्यानंतर दोन दिवसानंतर २४ ऑक्टोबर २०१९ रोजी मतमोजणी करण्यात आली होती.