Breaking News

महायुतीच्यादृष्टीने माहीमचा विषय संपला ; राजपुत्राला पाठिंबा देणारे भाजप नेत्यांनी यु टर्न घेतला !

राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महायुती की महाविकास आघाडी कोण सत्ता स्थापन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सगळं नक्की अलबेल आहे का ? असे प्रश्न चर्चेत होते. विविध उमेदवारी आणि बंडखोरी यामुळे वेगळं वळण निवडणुकांमध्ये आलं होत. यामध्ये माहीम विधानसभा मतदार संघ हा मुख्य स्थानी होता असं म्हणायला हरकत नाही. राजपुत्र अमित ठाकरे , शिंदे गटाचे सदा सरवणकर यांच्यात लढत होणार की नाही ? सदा सरवणकर माघार घेणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. यात अजून एक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे भाजप नेत्यांचा राजपुत्राला पाठिंबा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील सदा सरवणकर यांना महायुती म्हणून पाठिंबा मिळाल्याचे सुरवातीला दिसून आले नाही. कारण अनेक भाजप नेत्यांनी अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्याने महायुतीमधून त्यांच्याविरोधात उमेदवार नको, असा सूर आळवला होता. यामध्ये प्रसाद लाड, नितेश राणे, आशिष शेलार यांचा समावेश होता. राज ठाकरे यांनी लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्या मुलाविरोधात उमेदवार नको, अशी भाजप नेत्यांची भूमिका होती. पण आता चित्र वेगळं दिसत आहे.

या सगळ्यात सदा सरवणकर हे मात्र माहीममधून निवडणूक लढणार यावर ठाम होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर या मुद्द्यावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये तणाव निर्माण होईल, अशी चिन्हं दिसत होती. मात्र, सदा सरवणकर हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील, हे स्पष्ट झाल्यानंतर भाजप नेत्यांच्या भूमिकेत अचानक बदल झाल्याचे दिसले.

भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आमचा पाठिंबा हा सदा सरवणकर यांनाच असेल, असे स्पष्ट केले. तसेच, राज ठाकरे यांच्याशी उत्तम वैयक्तिक संबंध असलेल्या आशिष शेलार यांनीही यु टर्न घेतला. त्यांनी म्हटले की, महायुतीच्यादृष्टीने माहीमचा विषय संपला आहे. महायुतीचे उमेदवार आता सरवणकरच आहेत आणि महायुतीचा उमेदवार तोच आमचा उमेदवार, अशी भूमिका आशिष शेलार यांनी घेतली.

2009 माहीम विधानसभा निवडणूक निकाल

पक्ष

उमेदवाराचे नाव

एकूण मतं

मनसे

नितीन सरदेसाई

48734 (विजयी)

काँग्रेस

सदा सरवणकर

39808 (पराभूत)

शिवसेना

आदेश बांदेकर

36364 (पराभूत)

2014 माहीम विधानसभा निवडणूक निकाल

पक्ष

उमेदवाराचे नाव

एकूण मतं

शिवसेना

सदा सरवणकर

46291 (विजयी)

मनसे

नितीन सरदेसाई

40350 (पराभूत)

भाजपा

विलास आंबेकर

33446 (पराभूत)

2019 माहीम विधानसभा निवडणूक निकाल

पक्ष

उमेदवाराचे नाव

एकूण मतं

शिवसेना

सदा सरवणकर

61,337 (विजयी)

मनसे

संदीप देशपांडे

42,690 (पराभूत)

काँग्रेस

प्रवीण नाईक

15,246 (पराभूत)