kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

बालदिनानिमित्त आमदार रवींद्र धंगेकर यांनी बालचमूलामिठाई वाटून साजरी केली नेहरू जयंती व लहुजी वस्ताद जयंती

आज महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात भाजप सरकारमार्फत सर्व लोकशाही संकेत धुडकावून बेबंदशाहीचा कारभार सुरू आहे. या अंदाधुंद कारभाराच्या पार्श्वभूमीवर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांची प्रकर्षाने गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी केले. पंडित नेहरू जयंतीनिमित्त आज नेहरू स्टेडियम येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उल्हासदादा बोलत होते. यावेळी क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांनाही उपस्थितांनी जयंतीनिमित्त अभिवादन केले.

यावेळी बोलताना उल्हासदादा म्हणाले की, महाराष्ट्रात विधानसभेच्या सध्या निवडणुका सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर नेहरू जयंती साजरी करताना या राज्यात पुन्हा लोकशाही आणि संविधान सर्वोच्च स्थानी ठेवणाऱ्या राज्यकर्त्यांची महाराष्ट्रात गरज आहे, याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. पंडित नेहरू यांनी आधुनिक भारताची पायाभरणी करताना देशात अनेक विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन संस्था उभारल्या. ‘इस्रो’सारखी अंतरिक्ष संशोधन संस्था नेहरूंनीच सुरू केली. नेहरूंच्या पुढाकाराने पुणे परिसरातही असंख्य संस्था उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे पुण्याच्या वैभवात भर पडली आहे. पंडित नेहरूंनी अत्यंत सुसंस्कृत राजकारण केले. विरोधकांनाही संसदीय राजकारणात योग्य तो मानसन्मान दिला. पण आज सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांचे संपूर्ण खच्चीकरण करण्याचे काम विद्यमान राजवटीत सुरू आहे. संसदेत विरोधकांचा माइक बंद केला जातो, त्यांचा आवाज दाबला जातो, दरवाजे बंद करून आवाजी मतदानाने कोणताही विषय दडपून संमत केला जातो, संवेदनशील विषयांवर चर्चा होऊ दिली जात नाही. हा सगळा प्रकार जर थांबवायचा असेल, तर आपल्याला नेहरूंच्या विचारानेच यापुढील काळात मार्गक्रमण करावे लागेल, असेही उल्हासदादा म्हणाले.

आमदार रवींद्र धंगेकर यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली वाहतानाच, क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांनी समाजकारणात दिलेल्या योगदानाचेही स्मरण केले. लहुजी वस्ताद यांनी अनेक माणसे घडवली. त्यांच्या तालमीत बलोपासनेबरोबरच राष्ट्रउपासनेचेही धडे दिले गेले, असे ते म्हणाले.

यावेळी उपस्थित बालचमूनेही पंडितजींच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर या उपस्थित बालचमूला रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते खाऊवाटप करण्यात आले. उपस्थित बालकांनी नेहरू चाचा आणि लहुजी वस्ताद यांच्या नावांचा जयघोष करीत त्यांना अभिवादन केले.

या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी गृह राज्यमंत्री व कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश बागवे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस संजय बालगुडे, नरेंद्र व्यवहारे, अप्पा शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.