kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

विधानसभेत १२८ जागा लढवून शून्य जागा (फक्त १.५५ टक्के मते) मिळालेल्या मनसे नेते राज ठाकरे यांनी पहिल्यांदा पक्ष आणि चिन्ह (रेल्वे इंजिन) वाचवण्यावर आत्मचिंतन करावे – आनंद परांजपे

विधानसभेत १२८ जागा लढवून शून्य जागा (फक्त १.५५ टक्के मते) मिळालेल्या मनसेवर पक्षचिन्ह रेल्वे इंजिन जाते की काय अशी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा कशा मिळाल्या याच्यावर चिंतन करण्यापेक्षा आपला पक्ष कसा वाचेल… आपल्या पक्षात कार्यकर्ते… पदाधिकारी कसे टिकतील आणि महाराष्ट्रातील जनता आपली भूमिका स्वीकारेल का यावर आत्मचिंतन करावे असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मनसे नेते राज ठाकरे यांना लगावला आहे.

मनसे नेते राज ठाकरे यांनी वरळी येथे झालेल्या त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राज ठाकरे हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत परंतु या महाराष्ट्राने त्यांची बदलणारी भूमिका बघितली आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादीच्या बाजुने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार केला. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी समर्थन दिले. विधानसभेत महायुतीत येणार की नाही अशा गोंधळलेल्या स्थितीत मनसे त्यावेळी होती. राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेत जरी अपेक्षित यश मिळाले नाही तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा जनतेसमोर गेला. महाराष्ट्रातील जनतेशी नाळ जोडून लोकांचे प्रश्न समजून ते सोडवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केला पण मनसे कायम ऋतूप्रमाणे आपली भूमिका बदलणारी दिसली असा थेट हल्लाबोलही आनंद परांजपे यांनी केला.

२०१९ मधील लोकसभेतील राज ठाकरे यांची सर्व भाषणे बघितली तर ज्या ठिकाणी कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते तिथे ते प्रचाराला गेले. महायुतीच्या विरोधात त्यांनी प्रचार केला. पंतप्रधानांच्या विरोधात भाषणे केली. तर दुसरीकडे २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणायचे आहे यासाठी समर्थन दिल्याची भूमिका जाहीर केली होती. या गोंधळलेल्या अवस्थेमुळे महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या भूमिकेवर कधी विश्वास वाटला नाही असेही आनंद परांजपे म्हणाले.

राज ठाकरे यांच्या मनसेला २००९ मध्ये १३ आमदार निवडून आणता आले. मात्र त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत म्हणजे २०१४ ला एक आमदार निवडून आला. २०१९ ला एक आमदार आला. आता तर मनसेला महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधीत्वदेखील नाही त्यामुळे आत्मचिंतन करण्याची गरज त्यांना आणि त्यांच्या पक्षाला आहे असाही उपरोधिक टोला आनंद परांजपे यांनी लगावला.