kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मनसेचा मीरा रोड परिसरात खळ्ळखट्याक्, मराठीत बोलण्यास नकार दिल्यानं मनसैनिकांनी दुकानदाराला चोपलं

राज्यात हिंदी सक्तीवरुन वातावरण तापलेलं असतानाच मिरारोड भागात मनसैनिकांनी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकानदारास चोप दिला. मिरारोडच्या बालाजी हॉटेलजवळ ही घटना घडली. मिरारोडचे उपशहर प्रमुख करण कांडणगिरे यांनी दुकानदारास कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. या प्रकरणी काशीमिरा पोलीस ठाण्यात मनसेच्या 7 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसेचा हिंदी सक्ती’ रद्द झाल्यानंतर जल्लोष :

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंदी सक्ती’ बाबत काढलेले दोन जीआर रद्द करण्याची घोषणा केली. याची घोषणा रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील पत्रकार परिषदेत करण्यात आली. यानंतर मराठी प्रेमींनी आनंद साजरा केला. यावेळी मिरा भाईंदर मधील मनसैनिक मीरा रोड इथल्या बालाजी हॉटेलजवळ जल्लोष करत होते. या दरम्यान काही कार्यकर्ते पाणी पिण्यासाठी जोधपूर स्वीट या दुकानात गेले. त्यावेळी दुकान मालकानं हिंदी भाषेत संवाद साधला. तेव्हा मनसैनिकांनी दुकानदारास मराठी शिका आणि मराठीत बोला असं सांगितलं. पण दुकान मालकानं मराठीत बोलण्यास नकार दिला. आपण ज्या राज्यात नोकरी व्यवसाय करता, तिथल्या भाषेचा आदर का करत नाही? असा जाब मनसैनिकांनी विचारला. तेव्हा दुकान मालकाकडून मिळालेल्या उत्तरानं मनसैनिक चिडले. यानंतर त्यांनी दुकानदारास चांगलाच चोप दिला.

स्थानिक गुजराती, मारवाड्यांकडून मारहाणीचा निषेध :

दुकानदाराला मारहाण झाल्यानंतर स्थानिक गुजराती, मारवाडी व्यापाऱ्यांकडून जोरदार निषेध करण्यात आला. स्थानिक भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी सोशल मीडियावर या घटनेचा निषेध करत कायदेशीर कारवाईची मागणी केली. मारहाण झालेले दुकानदार बाबूलाल चौधरी यांच्या फिर्यादीवरून काशिमिरा पोलीस ठाण्यात धमकी, शिवीगाळ, दमदाटी अशा विविध कलमांतर्गत मनसेच्या 7 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

‘दुकानदारानं मराठीचा अपमान केला, त्याला मनसैनिकांनी प्रत्युत्तर दिलं’ :

या घटनेबाबत मनसेचे शहर प्रमुख संदीप राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “संबंधित दुकानदाराकडून मराठीचा अपमान करण्यात आला, त्यानंतर त्याला मनसैनिकांनी उत्तर दिलं”, असं राणे यांनी सांगितलं. तसंच, “आमदार नरेंद्र मेहता यांनी जी सोशल मीडिया पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये मारवाडी, गुजराती असा उल्लेख आहे. त्यामुळे तुम्हाला मराठी माणसानंही मतदान केलं आहे, हे विसरू नका”, असा सल्लाही राणे यांनी आमदार मेहतांना दिला.

पुढे बोलताना राणे म्हणाले, “या घटनेवरून आमदार मेहता हे आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत. अशा स्थितीत भविष्यात जर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याला नरेंद्र मेहता जबाबदार असतील”. दरम्यान, याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढील कारवाई सुरू असल्याचं काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितलं.