अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकूहल्ल्याची घटना गंभीर असली तरी मुंबईला असुरक्षित ठरवणे चुकीचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित मेगा सिटी आहे. ही घटना गंभीर असली तरी शहराला असुरक्षित ठरवणे चुकीचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी महाआघाडीच्या नेत्यांच्या ठणकावले.
सैफ अली खानच्या घरी जी घटना घडली, त्यातील हल्लेखोर इमारतीच्या पायऱ्यांचा वापर करून वरती गेला आणि फायर एक्झिटमधून घरात शिरल्याचे समोर आले आहे. याबाबत संशयित हल्लेखोराची माहिती काढली असून त्याच्या शोधासाठी १० पथके मुंबईतील विविध भागात पाठवण्यात आली आहेत. या प्रकरणातील हल्लेखोराला अटक केल्यानंतर अन्य माहिती देता येईल. परंतु, प्रथमदर्शनी तपासात हा हल्लेखोर चोरी करण्याच्या उद्देशानेच घरात शिरला असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, सिने विश्वातील सेलिब्रिटी, राजकारणातील मंडळी, नेते लीलावती रुग्णालयात जाऊन सैफ अली खानची भेट घेत आहेत. सैफ अली खानच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत. तसेच या हल्ल्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत आहेत. सैफ अली खानची प्रकृती आता स्थित असून, उद्यापर्यंत डिस्चार्ज मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.