भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांच्या गोटात आनंदाचं वातावरण होतं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे आपल्यासोबत येतील, असा विरोधातील इंडिया आघाडीचा दावा होता. पण नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी आपण एनडीएसोबत कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा झाला. नितीश कुमार यांनी शपथविधीचा कार्यक्रम लवकर पार पाडावा, अशी विनंती केली होती. त्यानंतर अखेर मोदी 3.0 सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम आज पार पडला.
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनीही शपथविधी सोहळ्याला उपस्थिती दर्शवली.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी एक्स (X) मीडियावर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन, अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे.
जेडीयूचे खासदार रामनाथ ठाकूर यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. जितिन प्रसाद, श्रीपाद नायक, पंकज चौधरी, कृष्णपाल गुर्जर यांनी स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.