लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या थोडक्या अपयशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता कंबर कसली असून विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे घोषवाक्य घेत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिनांक १९, २०, २१ जून रोजी अहमदनगर इथून राज्यव्यापी दौऱ्याची आज पत्रकार परिषदेत घोषणा केली. सलग तीन दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान वेगवेगळ्या राजकीय लोकांचे पक्षप्रवेशही होणार आहेत. शिवाय नगर जिल्ह्यातील नगर शहर, कोपरगाव, अकोले या विधानसभा मतदारसंघात, शिवाय लोकसभा दक्षिणनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावाही सुनिल तटकरे घेणार आहेत.

लोकसभेच्या अधिवेशनात सुरुवातीचा लोकसभा सदस्य म्हणून जी शपथ घ्यावी लागेल तो कालावधी सोडता उर्वरित कालावधी महाराष्ट्रामध्ये संघटनेची पुनर्बांधणी विशेष करुन ज्या – ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सदस्य आहेत त्या मतदारसंघाचा संघटनेचा व्यापक दौरा करण्याचे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार या दौऱ्याची घोषणा आज सुनिल तटकरे यांनी केली.

४० वर्षात लोकसभा निवडणुका जवळून पाहिल्या आणि लढल्या आहेत. पाचवेळा विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलो आहे असे सांगतानाच प्रत्येक निवडणूक एक वेगळे परिमाण घेऊन येत असते. २००४, २००९, २०१४,२०२४ ची निवडणूक असेल या निवडणुकीची वेगळी समीकरणे राहिली आहेत. तर विधानसभेलाही वेगळी समीकरणे पहायला मिळाली असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात आलेले जे कौल बघितले तर महायुतीला जे अपेक्षित यश अभिप्रेत होते. ते आम्ही मिळवू शकलो नाही. हे निर्विवाद सत्य आहे. जनतेने दिलेला कौल स्वीकारला आहे. अल्पसंख्याक व मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज या निवडणुकीत आमच्यापासून दूर गेलेला दिसला. या सर्वच घटकांशी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप मतदानासाठी नव्हे तर विचाराच्या माध्यमातून राज्याच्या वेगवेगळ्या भागात त्या त्या पक्षाशी जोडले गेले होते. मात्र शेतकऱ्यांच्या मनात कांदा, सोयाबीन, कापूस हे सर्व प्रश्न एकाचवेळी निर्माण झाले आणि त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवू शकलो नाही. याही गोष्टींची जाणीव असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे मतदान होत असते आणि विधानसभेला वेगळे होत असते. या निवडणुकीच्या माध्यमातून जे काही अनुभवायला मिळाले त्यावरून सखोल विचार आम्ही करणार आहोत. राज्यात झालेल्या लोकसभा निवडणूक निकालाचे सूक्ष्मपणाने अवलोकन केले आहे. बारकावेही समजून घेतले आहेत. प्रादेशिक विभागात घडलेल्या निकालाचा विचारही केला. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत प्रकर्षाने काम करणार आहोत असे सुतोवाचही सुनिल तटकरे यांनी केले.

गेले सात – आठ दिवस जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्याबाबतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत एक नकारात्मक भावना निर्माण करण्यात आली. काही ठिकाणी सहानुभूती बोलण्यात आली. ती असू शकते ते नाकारत नाही ती निवडणूकीपूरती सिमीत असते असेही सांगताना सन १९८४, १९८९,१९९०, १९९१, १९९५, १९९६, १९९८, अशा कालावधीत कसे चित्र बदललेले दिसले हा अनुभवही सुनिल तटकरे यांनी यावेळी सांगितला.

आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह आहे, आत्मविश्वास आहे. निवडणूकीत आलेल्या अपयशामुळे फार कुणी आत्मविश्वास गमावलेला नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा राज्यव्यापी संघटनेचा दौरा करत असल्याचे सुनिल तटकरे म्हणाले.

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर अजितदादा पवार यांच्या राज्यव्यापी दौर्‍याचे नियोजन करत आहोत असेही सुनिल तटकरे यांनी जाहीर केले.

या निवडणुकीत एक बाब प्रकर्षाने जाणवली की, निवडणूकांची तारीख जशी जवळ आली तसा अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी एक विशेष मोहीम जाणीवपूर्वक राबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात यश आले असेल मी नाकारत नाही किंवा ती बाजू समजावण्यात आम्ही कमी पडलो असे स्पष्ट करतानाच या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आता काम करत आहोत हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.

नगरला जो काहींचा वर्धापन दिन साजरा झाला त्यात डॉक्टर, वकील जितेंद्र आव्हाड यांचे भाषण ऐकले, त्यांनी चारवेळा पवारसाहेबांनी अजितदादांना वेडं बनवले असे वक्तव्य केले. जे आम्ही सांगत आलो तेच म्हणजे २०१४, २०१६, २०२२ मध्ये भाजपसोबत जायचे हे ठरले होते त्यावर शिक्कामोर्तब डॉक्टरांनी केले त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे उपरोधिकपणे आभार मानले.

जयंत पाटील हे गेली सहा वर्षे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना व्यासपीठावरुन मी फक्त चार महिने आहे हे सांगावे लागले. तुम्ही चार महिने सोशल मीडियावर बोलू नका हेही सांगावे लागले. चार महिन्यानंतर अध्यक्ष पद सोडणार आहे. निवडणूकीच्या यशानंतर एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला या पध्दतीच्या भावना राष्ट्रीय नेतृत्वासमोर बोलाव्या लागतात हे कशाचे द्योतक आहे.म्हणून काचेच्या घरात राहणार्‍यांनी दुसर्‍याच्या घरावर दगड मारु नये असा खरमरीत टोला सुनिल तटकरे यांनी लगावला. आता महाराष्ट्रात गेली २५ वर्षे अविरत २४ तास राबणाऱ्या अजितदादांच्या पाठीशी सहानुभूती तयार होईल आणि महायुती म्हणून आम्ही निवडणूकीला सामोरे जाऊ असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, संजय तटकरे उपस्थित होते.