निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यातील निवडणूका जाहीर केल्या. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. २०१९ मध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले होते आणि आताही एकाच टप्प्यात महाराष्ट्राचे मतदान होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने… पूर्ण क्षमतेने महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिले.

आता अधिक गतीने उरलेल्या जागावाटपांचा निर्णय येत्या दोन दिवसात होईल.याचे नियोजन आज आणि उद्या एकत्र बसून करणार आहोत. महायुती म्हणून २८८ जागांवर बुथनिहाय महायुतीतील पक्ष व घटकपक्ष यांची ताकद एकत्रितपणे कशी करता येईल यादृष्टीने विधानसभा निहाय निरीक्षक नेमलेले आहेत. आता या सर्व कामाला गती द्यावी लागणार आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

विरोधकांना फक्त टिकाटिप्पणी करायची आहे. लोकांच्या मनात संभ्रमाची भावना निर्माण करायची आहे. लोकसभेत जसा खोटा प्रचार करण्यात यशस्वी झाले तसा खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न आता करतील आणि महाराष्ट्रात निवडणूका होणार नाही असा खोटा प्रचार आताही निर्माण केला परंतु संविधानाने सारा देश बांधला गेला आहे…जोडला गेला आहे. त्यामुळेच आज निवडणूक आयोगाने २६ नोव्हेंबरच्या आत राज्यात सरकार अस्तित्वात यायला हवे हे कायद्याने बंधनकारक आहे हे स्पष्ट केले आहे. आम्ही संविधानाच्या आधारे काम करत आहोत. मात्र आवई उठवणे… खोटा प्रचार करणे हा विरोधकांचा एककलमी कार्यक्रम आहे असा टोला सुनिल तटकरे यांनी विरोधकांना लगावला.

निवडणूक आयोगाने प्रचारासाठी दिलेला वेळ हा नक्कीच पुरेसा आहे. २८८ जागांवर पहिल्यांदाच निवडणूका होत आहे असे नाही. तारखा भारतीय निवडणूक आयोगाने मुंबईत सर्व राजकीय पक्षांची बैठक घेतली होती. त्यावेळी सर्वच पक्षांनी दिवाळी हा चार दिवसांचा सण आहे. त्यामुळे त्यानंतरच्या तारखा असाव्यात अशी मागणी केली होती. आज निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्यच आहे असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

सन १९९५ मध्ये सर्वाधिक ४५ अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर दर निवडणूकीत अपक्ष उमेदवारी लढण्याची संख्या वाढत गेली. यावेळीही अपक्ष उमेदवारी दाखल होऊ शकतात. जवळपास बर्‍याच मतदारसंघात भावी आमदार म्हणून लागणारे बॅनर बघितले तर एका मतदारसंघात दहा भावी आमदारांची संख्या पहायला मिळत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीबरोबर प्रचार केला जात आहे याचा अर्थ ते निवडणूक लढू शकतात. आमच्या महायुतीतील कुठलेही कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणार नाहीत. याची दक्षता घेतली जाणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

आमदार इंद्रनील नाईक हे वेगळा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहे. अशी गेले काही दिवस अफवा पसरवण्याचे काम होत आहे.परंतु आमदार इंद्रनील नाईक यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझी भेट घेतली त्यामुळे जी चर्चा होती ती निव्वळ अफवा होती अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत माध्यमांना दिली.

इंद्रनील नाईक हे पहिल्या टर्ममध्ये निवडून आल्यावर गेली पाच वर्षे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड विकासकामे मतदारसंघात नेण्यात इंद्रनील नाईक हे यशस्वी झाले. ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहून उद्याच्या भवितव्यासाठी राजकीय वाटचाल करणार आहेत. त्यामुळे इंद्रनील नाईक यांच्याविषयी सुरू असलेला विषय अफवा आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *