नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळं राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरात प्रकरणात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नीलम गोऱ्हे गेल्या सात ते आठ वर्षांपासून अशोक खरात याला आमदारकी तसेच मंत्रिपदासाठी भेटत असल्याचे आरोप तृप्ती देसाई यांनी केलेत. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत तृप्ती देसाई यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.
“गेल्या चार दशकांपासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. माझी संपूर्ण कारकीर्द एका स्फटिकाप्रमाणे स्वच्छ आणि पारदर्शी राहिली आहे, जी संपूर्ण जनतेसमोर आहे. माझ्या कामाची पद्धत आणि माझी तत्व कधीही कोणापासून लपलेली नाहीत. माझे पंढरपूर येथील आजोबा, माझी आई, वडील यांनी माझ्यावर जे संस्कार केले त्याचे मी काटेकोर पालन करत आले आहे,” असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
“कोणत्याही ढोंगी गुरूचा अवतार म्हणवणाऱ्या बुवांना भेटायचं नाही. त्यांच्या दर्शनाला जायचं नाही. हा संस्कार मी आजही पाळते. माझी अढळ श्रद्धा देवदेवतांवर आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थांवर, साईबाबा, गोंदवलेकर महाराज आणि गाणगापूर येथील श्रीदत्त महाराज यांच्यावर आहे. महिलांची प्रगती व सामाजिक न्याय यावर काम करत मी राजकारणात आले. मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते. राजकीय पदं किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्याही तांत्रिक गुरूची किंवा बुवाबाजीची गरज भासलेली नाही,” असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी तृप्ती देसाई यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत.
नाशिक येथील एका हॉटेलमध्ये खरात नावाच्या व्यक्तीला 6-7 वर्षांपूर्वी कोणत्याही कारणासाठी भेटले, या वृत्ताचं नीलम गोऱ्हे यांनी स्पष्टपणे आणि निःसंदिग्धपणे खंडन केलं आहे. “अशा प्रकारच्या भेटीच्या बातम्या पूर्णतः कपोलकल्पित आहेत. माझी सामाजिक व राजकीय कृतिशीलता, विधान परिषदेचं उपसभापती पद आणि मंत्रिपदाचा दर्जा यामुळं काही मोजक्या व्यक्तींमध्ये द्वेष निर्माण झाला. अधिवेशन काळातील माझे संसदीय कार्य, सातारा एसपी निलंबन आदेशाची अंमलबजावणी आणि निरोपाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी माझी जी प्रशंसा केली, ती काही हितशत्रूंना सहन झालेली नाही. विशेषतः पुणे महानगरपालिकेत ज्यांना यश मिळालं नाही, असे काही असंतुष्ट घटक माझ्याविरुद्ध हे विषारी षडयंत्र रचत आहेत,” असा रोष नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
“ज्यावेळी ही बातमी आली, त्यावेळी अधिवेशन नुकतंच सुरू झालं होतं. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची ‘SIT’ चौकशी आधीच म्हणजे 13 मार्च रोजी जाहीर केली होती. अशावेळी पीठासीन अधिकारी म्हणून मी काहीही भाष्य करणं हे संसदीय नियमांनुसार चौकशीत हस्तक्षेप ठरलं असतं. त्यामुळंच मी अधिवेशनाच्या काळात संयम राखला. मात्र, अधिवेशन संपताच 26 तारखेला आयोजित कार्यक्रमात मी माझी कठोर भूमिका स्पष्ट केली आहे. मी समाजात चांगल्याप्रकारे काम करत असल्यामुळे या खोट्या प्रचाराला उत्तर देणं मला आवश्यक वाटत नव्हतं, परंतु आजकालच्या परिस्थितीत खोटं बोलून कोणाच्या हाती मिळू नये म्हणून मी ही वस्तूस्थिती मांडत आहे. या प्रकारच्या खोट्या प्रसिद्धीशी लढाई करायला मी सर्व प्रकारे सज्ज व समर्थ आहे,” असं स्पष्टीकरण नीलम गोऱ्हे यांनी दिलं.















