kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

“अर्थाचा अनर्थ करू नये” ; शिवाजी महाराज-रामदास स्वामींबाबतच्या वक्तव्यानं वाद झाल्यावर धीरेंद्र शास्त्रींचे वक्तव्य

24 एप्रिलला नागपूरमध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एक विधान केलं होत. ते या कार्यक्रमात बोलताना म्हटले होते, “शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांना राज्य सांभाळण्याची विनंती केली होती. त्यावर रामदास स्वामींनी रामदास स्वामींनी हसून म्हटलं की, ठीक आहे. आम्हाला मान्य आहे. पण एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही आमचे कोण आहात? महाराजांनी म्हटलं की, शिष्य आहे.मग शिष्याचं कर्तव्य आहे की, गुरूच्या आज्ञेचं पालन करायचं. असं म्हणून रामदास स्वामींनी तो मुकूट उचलून शिवाजी महाराजांच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले की, राज्य माझं आहे, पण आजपासून तुलाच ते चालवायचं आहे,” असा संवाद झाल्याचं धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितलं. पण यावर वाद निर्माण झाल्यानंतर आता याप्रकरणी धीरेंद्र शास्त्री यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांनी काय स्पष्टीकरण दिलं?

बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वक्तव्याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.

मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचे वृत्त काही जण चालवत आहेत. परंतु छत्रपती वीर शिवाजी महाराजांचा अवमान माझ्याकडून स्वप्नात देखील होणार नाही, असे धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले.

धीरेंद्र शास्त्रींनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हे स्पष्टीकरण दिले.

त्यात त्यांनी म्हटले, “महाराष्ट्राच्या भूमीत छत्रपती वीर शिवाजी यांचे स्मरण करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे मी छत्रपती वीर शिवाजी महाराजांचे स्मरण केले. गुरू परंपरेप्रति छत्रपती शिवाजी महाराज किती कटिबद्ध होते हे सांगण्यासाठी मी त्यांचं उदाहरण दिलं.”

“शिवाजी महाराज हे गुरू परंपरेप्रति किती नतमस्तक होते यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज युद्धामुळे श्रमले तेव्हा त्यांनी आपला मुकुट गुरू चरणी ठेवला. तेव्हा रामदास स्वामींनी त्यांना हे राज्य करावे असे सांगितले. त्यांनी तो मुकुट धारण केला आणि राज्य केले.”

“ते किती मोठे त्यागी होते हे सांगण्याचा माझा हेतू होता. एवढा मोठा सम्राट पण त्यांनी क्षणात याचा त्याग केला. या उद्देशाने मी ही कथा सांगितली,” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

ते पुढे म्हणाले, “परंतु तिथे जमलेल्या काही लोकांनी विशेषतः काही पत्रकारांनी या कथेला छत्रपती वीर शिवाजी यांची अवमानना करण्यात आल्याच्या दृष्टीने बघितले. मी त्यांना प्रार्थना करतो की अर्थाचा अनर्थ करू नये.”

“छत्रपती वीर शिवाजी यांची अवमानना आम्ही कशी करू शकतो? आमच्या कथेमध्ये जय भवानी, जय शिवाजीचे नारे लागतात आणि आम्ही त्यांचा अवमान कसा करू शकतो? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जागेपणीच काय तर स्वप्नात देखील मी करणार नाही. माझी पत्रकारांना विनंती आहे की सनातनविरोधी कृत्य आणि संतविरोधी कृत्य करू नका.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *