kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘पोलिसांना मोकळीक द्या, ड्रग्जचा प्रश्न ते निश्चितपणे संपवू शकतात’-अमित ठाकरे

“राजकारण्यांना पाचव्या वर्षी लोकांची गरज भासते. मात्र, पहिल्या चार वर्षांत लोकांना राजकारण्यांची खरी गरज असते. त्यामुळे आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. तर थेट जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरून काम करण्यावर आमचा भर आहे,” असे ठाम मत मनसे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

अमित ठाकरे यांनी, “लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपूर्वी लोकांना आकर्षित करण्यासाठी केलेला केवळ स्टंट होता,” असा आरोप केला. हायकोर्टाच्या निर्णयाचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की, “या योजनेमागील हेतू स्पष्ट झाला आहे. आता या योजनेचे पैसे थांबवण्यात आले आहेत. राज्यात शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे प्रश्न अधिकच गंभीर होत चालले आहेत. मात्र, सरकारकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत”, अशी टीकाही त्यांनी केली.

पुण्यात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या समस्येवर अमित ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. “शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात खुलेआम ड्रग्जची विक्री होत आहे. यामुळे तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असून काहींवर मृत्यूही ओढवला आहे,” असं त्यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना थेट आव्हान देत पोलिसांना 24 तास ‘फ्री हॅण्ड’ देण्याची मागणी केली. “आपले पोलीस सक्षम आहेत. त्यांना मोकळीक दिल्यास महाराष्ट्रातील ड्रग्जचा प्रश्न ते निश्चितपणे संपवू शकतात. मात्र, या ड्रग्जमधून निर्माण होणारा पैसा नेमका कोणाच्या खिशात जातोय, याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे,” असं त्यांनी स्पष्ट केले.

मराठी रिक्षा चालकांच्या मुद्द्यावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. रिक्षा परवान्यांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाचं त्यांनी समर्थन केलं. “ रिक्षाचालकांसाठी मराठी अनिवार्य करण्याच्या निर्णयाबाबत सरकारला आमचा पाठिंबा आहे. सरकारमधील लोकच विरोध करत आहेत. आम्ही मराठीसाठी कायम उभे आहोत. परप्रांतीय रिक्षाचालक मुंबई बंद करतील एवढी त्यांची ताकद आहे का? आमचे मराठी रिक्षाचालक मुंबई चालू ठेवण्यासाठी सक्षम आहेत. आम्ही मराठी रिक्षाचालकांच्या पाठिशी आहोत. ज्यांना मराठी येत नाही किंवा बोलायची इच्छा नाही, त्यांनी आपल्या राज्यात परत जावे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच “मराठी माणसाच्या विरोधात कुणी उभे राहिल्यास त्याला रस्त्यावरच उत्तर दिले जाईल”, असा इशाराही त्यांनी दिला.

पुणे जिल्ह्यातील आगामी दौऱ्यांविषयी माहिती देताना त्यांनी सांगितलं की,” शहरातील दौरा पूर्ण झाला आहे. आता प्रत्येक तालुक्यात जाऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. नदी सुधार प्रकल्पातील वृक्षतोड, वाढती पाणीटंचाई यांसारख्या प्रश्नांवर मनसे अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना आगामी काळात अधिक सक्रिय राहून जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत”. मनसे नेते अविनाश अभ्यंकर म्हणाले,” 19 वर्षात राज ठाकरेंनी राज्यासाठी उत्तम भूमिका घेतल्या आहेत. नागरिकांच्या प्रश्नावर मनसे टोकाच्या पातळीवर जाऊ शकते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *