kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुंबईत 63 तासांच्या ‘मेगाब्लॉक’ला विरोध ; राष्ट्रवादीचं ऍड.अमोल मातेले यांच्या नेतृत्वात आंदोलन

प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे उपनगरीय मार्गावरील 930 फेऱ्या रद्द होणार असल्याने 33 लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेने ब्लॉक मागे घ्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले.

मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ऍड.अमोल मातेले यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन करत मेगाब्लॉक मागे घेण्याची मागणी केली. मेगाब्लॉक घेण्यापूर्वी किमान 7 दिवस अगोदर रेल्वे प्रवाशांना सूचना देण्यात यावी, बेस्ट, एसटी बसची पर्यायी व्यवस्था करावी, मासिक पास धारक आणि मेल गाड्यांचे पूर्व बुकिंग असलेल्या प्रवाशांसाठी मोफत व्यवस्था करावी, अशा विविध मागण्या युवक काँग्रेसने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांच्याकडे केल्या.

मध्य रेल्वेच्या या ब्लॉकमुळे शेकडो रेल्वेगाड्या रद्द आणि शॉर्ट टर्मिनेट झाल्या आहेत. सीएसएमटीपर्यंत येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दादर, ठाणे, पनवेल, नाशिक व पुण्यापर्यंत चालवण्यात येतील. याशिवाय, सीएसएमटीवरून सुटणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दादर, पनवेल, नाशिक स्थानकातून सुटतील. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे या भागातील अनेक प्रवाशी नोकरीनिमित्त प्रवास करतात. परंतु, मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे प्रवासी लोकलमधून प्रवास कसा करणार हा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे, नोकरदार वर्गाला सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होम जाहीर करावा, अशी मागणी ॲड. सुशीबेन शाह यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. रेल्वेच्या ब्लॉकमुळे शासकीय किंवा निमशासकीय कार्यालये व खासगी कंपन्यातील नोकरदार वर्गाला ‘सुट्टी’ किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने 30/31 मे च्या मध्यरात्रीपासून ते 2 जून पर्यंत 63 तासांचा विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. तसेच सीएसएमटी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी 30/31 मे च्या मध्यरात्री ते 2 जूनच्या दुपारपर्यंत 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील 930 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. याचा फटका या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या तब्बल 33 लाख प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना एक आठवडा पूर्वसूचना देणे अपेक्षित होते. मात्र, ब्लॉक सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर ब्लॉकची घोषणा केल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.