लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे पाच दिवस बाकी असताना दावे प्रतिदावे करणं सुरू झालं आहे. प्रत्येक उमेदवार मीच जिंकून येणार असा दावा करत आहे. तसेच आपल्याच अलायन्सला अधिक जागा मिळतील असाही दावा करत आहे. पण ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे पडणार असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला आहे.

महाविकास आघाडीला राज्यात ३२ जागा मिळतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपले आहेत. मराठवाड्यात महायुतीला एकही जागा मिळणार नाही. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे पडणार आहेत. परमेश्वर रावसाहेब दानवे यांचा बदला घेणार आहे, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यात आठच्या आठ जागा महाविकास आघाडीच्या येणार आहेत असा आमचा रिपोर्ट आहे. असे ते म्हणाले.

चंद्रकांत खैरे म्हणाले की, महायुतीला ८ ते १० जागा मिळतील. अपक्ष वैगेरे कोण येणार नाही. महायुती, मविआत थेट लढत आहे. एकनाथ शिंदे संपले. सगळे खोके घेऊन गेलेत. लोकांना त्यांच्याबद्दल राग आहे. उद्धव ठाकरेंना सोडून दिले. ज्याने मोठे केले त्यांच्या विरोधात जातात त्यामुळे लोक विरोधात आहेत असं त्यांनी म्हटलं.

तसेच चंद्रकांत खैरे हे धार्मिक आहेत त्यामुळे लोकांना आवडतं. अनेकांनी माझ्या विजयासाठी नवस केला आहे. उद्धव ठाकरेंमागे जे वलय निर्माण झालं त्यातून अधिक बळ मिळालं. हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा गड आहे. तो कुठे जाऊ शकत नाही. महाविकास आघाडीच्या सर्व नेते, पदाधिकाऱ्यांनी काम केले आहे. अनेक मित्र मंडळींनी मदत केली आहे. दारू विकणाऱ्या माणसाला मदत कुणी केली नाही अशा शब्दात चंद्रकांत खैरेंनी नाव न घेता संदीपान भुमरे यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. विरोधी उमेदवार जिंकून येणं कठीण आहे. हे होऊ शकत नाही. छत्रपती संभाजीनगरच्या लोकांनीही तुम्ही विजयी होणार असं सांगितले आहे. मी १० हजार काय, ५००० हजार असो पण मी निवडून येणार आहे. मला अनेक जण भेटतात, आम्ही तुम्हालाच मतदान केले. दारु विकणाऱ्या माणसाला कशाला मतदान करायचे? असं महिला बोलत होत्या. दारूबाबतीत लोकांना प्रचंड राग आहे. २५ दुकाने त्याने उघडली आहेत. लोकांची सेवा करायला तुम्ही मंत्रिमंडळात गेला की स्वत:च्या सेवेसाठी हा लोकांना प्रश्न आहे असंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं.