kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचं ७ वर्षांनी टीव्हीवर कमबॅक

‘वचन दिले तू मला’ या आगामी मालिकेतून अभिनेत्री श्वेता पेंडसे पुन्हा एका छोट्या पडद्याद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. याबद्दलची एक खास पोस्ट तिनं आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. या मालिकेत श्वेता पूर्वा शिंदे ही भूमिका साकारणार असून याच भूमिकेतील एक फोटो शेअर करत तिनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय आहे पोस्ट ?

या पोस्टमध्ये श्वेता म्हणते, “पोटात गोळा… छातीत धडधड… आणि तरीही प्रचंड आनंद आणि विलक्षण उत्साह जाणवतोय. ७ वर्षांनी पुन्हा एकदा मालिकेत अभिनय करतेय. म्हणतात ना… ‘सर्वात सुंदर गोष्टी तेव्हाच घडतात, जेव्हा आपण त्यांची अपेक्षाच करत नसतो’, अगदी तसंच झालं. बऱ्याच दिवसांपासून एका वेगळ्या आणि चांगल्या भूमिकेच्या शोधात होते आणि अक्षरशः मनीध्यानी एका दिवसात हे सगळं जुळून आलं. पहिल्या दिवशी सेटवर गेले; तेव्हा माझाच विश्वास बसत नव्हता की मी पुन्हा एकदा शूट करतेय.”

यापुढे ती म्हणाली, “माझा अभिनेत्री म्हणून मालिका विश्वातला प्रवास स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘लक्ष्य’ मालिकेपासून सुरू झाला. त्यानंतर याच वाहिनीवर ‘जयोस्तुते’ ही मालिका केली. नंतर ‘अस्सं सासर सुरेख बाई’ ही मालिका खूप गाजली. यातल्या ‘विभावरी इनामदार’ या भूमिकेने मला मालिकाविश्वात खऱ्या अर्थाने अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली. आता पुन्हा एकदा स्टार प्रवाहबरोबर नवीन प्रवास सुरू होतो आहे.

यापुढे अभिनेत्री म्हणाली, “‘वचन दिले तू मला’ या मालिकेत ‘पूर्वा शिंदे’ ही भूमिका करायची संधी मिळाली आहे. ही अत्यंत गोड व्यक्तिरेखा आहे. मला ऐकताक्षणी ही भूमिका फार भावली. कारण या व्यक्तिरेखेला खूप कंगोरे आहेत. माझ्यासाठी ही भूमिका साकारणं खरंतर एक आव्हान आहे. ते का? हे मालिका बघितल्यावर तुम्हाला कळेलच.”

यानंतर श्वेता म्हणते, “रंगभूमीवर ’38 कृष्ण व्हीला’ नाटकातील ‘नंदिनी’, ‘शशsss घाबरायचं नाही’मधली ‘निरांजनी’ आणि ‘खानावळवाली’, ‘अ परफेक्ट मर्डर’मधील इन्स्पेक्टर घारगे आणि आता ‘वचन दिले तू मला’ मालिकेमध्ये ‘पूर्वा शिंदे’ या अत्यंत भिन्न चार व्यक्तिरेखा एकाच वेळेस मला साकारायला मिळत आहेत. ही एक अभिनेत्री म्हणून किती सुखावणारी गोष्ट आहे.”

शेवटी श्वेतानं म्हटलंय, “मी आता मालिकेत कामच करणार नाहीये, असं सगळ्यांना वाटत असताना या सुंदर व्यक्तिरेखेची जबाबदारी माझ्यावर विश्वासाने आणि हक्काने दिल्याबद्दल मी सेवंथ सेन्स मीडिया आणि संपूर्ण स्टार प्रवाह टीमचे मनापासून आभार मानते. खरंतर खूप भीती वाटतेय; पण मी जीव ओतून काम करेन. तुम्हालाही पूर्वा शिंदे, या मालिकेतल्या इतर सगळ्याच व्यक्तिरेखा आणि ही मालिकासुद्धा खूप आवडेल याची आशा नव्हे तर खात्री आहे. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठीशी असू द्या.”