नाशिक येथील काळाराम मंदिर परिसरात करण्यात आलेली पोस्टरबाजी ही व्यक्तीगत वैमनस्यातून झाली असून हे पत्रक काढणारी व्यक्ती दुर्दैवाने अनुसूचित प्रवर्गातील असल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी वेळीच सत्य समोर आणल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका टळला आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. तर त्याचवेळी राजकीय नेत्यांनी अशा पोस्ट केल्यास समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवित त्यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कान टोचले. तर याप्रकरणी पोलीस प्रशासनाला खबरदारीचे निर्देश दिल्याची माहितीही फडणवीस यांनी यावेळी दिले.
नाशिक येथील काळाराम मंदिर परिसरात शनिवारी दलितविरोधी पत्रके टाकण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. या पत्रकात हिंदू राष्ट्राचा उल्लेख करत या पत्रकात दलित समाजाला धमकी देण्यात आली होती. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हे पत्रक त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करीत ‘ही किड संपवायला, कोण असेल त्याला बेड्या ठोका, आता निळा झेंडा घेऊनच काळाराम मंदिरात जाऊ, बघू कोण रोखतो’ असा इशारा आपल्या पोस्टमधून दिला. तर, अशी पत्रकबाजी करून दलित आणि सवर्ण तेढ निर्माण करण्याच्या षडयंत्राच्या सखोल चौकशीची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. तेढ निर्माण करून समाजात फूट पाडण्याचा हा प्रकार असल्याने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आठवले यांनी केली.
दरम्यान, या सर्व प्रकरणाची नाशिक पोलिसांनी चौकशी केली. पत्रक काढणाऱ्याला अटक केली आहे. दुसऱ्या व्यक्तीसोबतच्या वैमनस्यातून त्याने हे पत्रक काढले. मात्र, पत्रक काढणारी व्यक्ती अनुसूचीत जाती प्रवर्गातील असल्याचे तपासात आढळून आले आहे. पोलीस या पत्रकामागील अन्य कारणांचा शोध घेत आहेत. या मागे अन्य कोणी आहे का, दंगल घडविण्यासाठी असे पत्रक काढले का, या सर्व बाबींचा पोलीस तपास करत आहेत. मात्र, यापुढेही जातीय तेढ निर्माण करणारी पत्रकबाजी होण्याची शक्यता आहे.