Breaking News

जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; विक्रमादित्य सिंह यांच्यावर कंगना राणौतचा हल्लाबोल

हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाची उमेदवार आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत सतत प्रचारात व्यस्त आहे. मंगळवारी कंगना प्रचारासाठी चंबा जिल्ह्यातील पांगी या दुर्गम भागात पोहोचली. येथे तिने तिचे प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पांगी येथील जाहीर सभेला संबोधित करताना कंगनाने काँग्रेस आणि विक्रमादित्य सिंह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

रॅलीदरम्यान कंगना राणौतने मंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांना खोचक टोला लगावला आहे. “यांच्यापेक्षा भ्रष्ट कोणी नाही. त्यांना जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी आहे. मी तुमच्यासारखी नाही, विक्रमादित्य, जे आपल्या आई-वडिलांच्या नावाने मत मागत आहेत”

“मी पद्मश्री आहे, एक चित्रपट निर्माती आहे, मी स्वतःचं काम स्वत:च करते. मी स्वतःचे पैसे कमावते, मी जनतेचे पैसे घेत नाही. मी त्यांचे पैसे खर्च करत नाही, मी त्या पैशांकडे पाहत देखील नाही” असं कंगना राणौतने म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना कंगना म्हणाली की, “एकीकडे ही भ्रष्ट काँग्रेस आहे आणि दुसरीकडे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ज्यांच्या चारित्र्यावर एकही डाग नाही. आजपर्यंत त्यांनी एक पैसाही आपल्या हातात ठेवला नाही. एवढ्या वर्षात त्यांच्या नावावर एक घोटाळा असेल तर सांगा.”