kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले…

पुण्यातील कल्याणीनगर येथे भरधाव आलिशान पोर्शे कारने दोन जणांना उडवले. पोर्शे कारने अनिश अवधिया या तरुणाच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीवर पाठीमागे बसलेली अश्विनी कोष्टाही तरुणी हवेत उडाली आणि जमिनीवर आदळली. तर अनिश पुढे जाऊन एका चारचाकी कारवर आदळला. गंभीर जखमी झालेल्या दोघांचाही यात मृत्यू झाला. मात्र या गंभीर घटनेनंतरही आरोपीला काही तासातच जामीन मिळाल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. यानंतर पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाला, मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल चालक तसेच अल्पवयीन असतानाही चारचाकी चालविण्यास देणाऱ्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीला कोर्टात दाखल केल्यानंतर कोर्टाने अल्पवयीन आरोपीला ३०० शब्दांत निंबध लिहायला सांगितला तसेच पोलिसांसोबत वाहतूक नियमन करण्याची शिक्षा सुनावली. आरोपीला तत्काळ जामीन दिल्याने सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे.

दरम्यान, यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत पुण्यातील घटनेवर आपला संताप व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी म्हटले की, मोदी दोन हिंदुस्तान निर्माण करत आहेत. एक अब्जाधीशांचा व एक गरीब जनतेचा.बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर, ओला, उबर यांच्याकडून चुकून अपघातात कोणाचा मृत्यू झाला, तर त्यांना १० वर्षांची शिक्षा होते. मात्र श्रींमत घरातला १६ , १७ वर्षांचा मुलगा मद्य प्राशन करून पोर्शे कार चालवतो आणि दोन लोकांची हत्या करतो. तर त्याला सांगितलं जातं की निबंध लिहा.जर एखाद्या ट्रक चालकाने किंवा अन्य वाहन चालकाने एखाद्याला उडवल्यास १० वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. मात्र एका अब्जाधीशाच्या मुलाने दोघांचा जीव घेतल्यावर त्याला निबंध लिहायला सांगितले. ट्रकचालक, ओला-उबर चालकांकडून असे निबंध का लिहून घेतले जात नाहीत. एका मुलाखतीत पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्यात आला की, देशात श्रीमंत आणखी श्रीमंत व गरीब आणखी गरीब बनत आहेत. त्यावर मोदी म्हणतात की, मग काय सर्वांना गरीब बनवू. प्रश्न हा नसून न्यायाचा आहे. श्रीमंत व गरीबांना समान न्याय मिळायला पाहिजे. याचसाठी आम्ही लढत आहे. अन्यायाविरोधात लढत आहोत.

पुणे प्रकरणाबाबत प्रशासन हलले असून आज देवेंद्र फडणवीसांनी पुणे आयुक्तालयात बैठक घेत पोलिसांनी महत्वाच्या सूचना केल्या. या प्रकरणी ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह अल्पवयीन मुलाला बार, पबमध्ये प्रवेश देणाऱ्याहॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

विशाल अग्रवाल याला संभाजीनगरमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आहेत. विशाल अग्रवाल याला पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलंय. मेडिकल टेस्टनंतर विशाल अग्रवालला उद्या कोर्टात हजर केलं जाईल.