मणिपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मेईतेई आणि कुकी समाजात हिंसाचार भडकला आहे. यावरुन काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मणिपूरचा दौरा केला होता. त्यात त्यांनी पीडितांसाठी उभारलेल्या मदत शिबिरांना भेटी होत्या.

दरम्यान, आज(दि.11) राहुल गांधी यांनी आज मीडियाशी संवाद साधताना याच मुद्द्यावरुन केंद्र सरकारला आणि पीएम नरेंद्र मोदींना खास अपील केली. राहुल गांधी म्हणाले की, मजबूत विरोधक म्हणून आम्ही संसदेत मणिपूरमधील अशांततेचा मुद्दा मांडत राहू. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरचा दौरा करावा आणि राज्यातील पीडितांच्या समस्या ऐकून घ्याव्यात अन् शांततेचे आवाहन करावे.

राहुल पुढे म्हणाले, हिंसा सुरू झाल्यापासून मी तीनवेळा मणिपूरचा दौरा केला, पण दुर्दैवाने परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. आजही राज्याचे दोन तुकडे झाले आहेत. घरे जळत आहेत, निरपराधांचा जीव जातोय. हजारो कुटुंबांना मदत छावण्यांमध्ये राहावे लागत आहे. ही शोकांतिका संपवण्यासाठी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी आम्ही संसदेत हा मुद्दा मांडत राहू, असेही ते म्हणाले.

राहुल गांधींनी मणिपूरच्या जनतेसाठी एक व्हिडिओ संदेश शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना राहुल गांधींनी पोस्टमध्ये लिहिले की, मी तुमची मदत करू शकतो, तुमचे मुद्दे संसदेत मांडून सरकारवर दबाव टाकू शकतो. पण, तुम्ही तुमच्या घरी परत कधी जाऊ शकाल, याची खात्री मी देऊ शकत नाही. याचे उत्तर फक्त सरकारकडे आहे. पुढच्या संसदेच्या अधिवेशनात मी तुमचा मुद्दा मांडणार आहे.