Breaking News

‘राजपुत्र’ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात !

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लागून राहिले आहे. अशातच, आता विधानसभेच्या रिंगणात ‘राजपुत्र’ मैदानात उतरणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेची आणखी एक यादी जाहीर झाली केली असून माहीम विधानसभा मतदारसंघातून ‘अमित राज ठाकरे’ हे विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत. तर वरळी विधानसभेतून ठाकरेंचे उमेदवार आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून याबद्दलची चर्चा होती. त्यानंतर आता दुसऱ्या यादीमध्ये अमित ठाकरे यांचे नाव जाहीर झाले आहे. ठाकरे घराण्यातले दुसरे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे आता कशाप्रकारे माहीम मतदारसंघातली गणित फिरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी मनसेचे पहिले आमदार राहिलेले दिवंगत रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. ते खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर भाजप नेते चंद्रकांत पाटलांना काटे की टक्कर देणाऱ्या किशोर शिंदेंना कोथरुडमधून संधी देण्यात आली आहे.