नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दमदार विजय मिळवत ७० पैकी ४८ जागा जिंकल्या होत्या. यानंतर आता भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाने रेखा गुप्ता यांची नेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत भाजपा दिल्लीच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्टद्वारे माहिती दिली आहे.
रेखा गुप्ता यंदाच्या निवडणुकीत दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील आहेत. २०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता यांनी शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला आहे.
दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. एकीकडे आम आदमी पक्षाकडून सत्ता कायम राखण्यासाठी जोर लावला जात होता तर दुसरीकडे भाजपाकडून दिल्लीतील २७ वर्षांची सत्तेची प्रतीक्षा संपवण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात येत होता.काँग्रेस आणि आप यांच्यात न झालेल्या युतीचा भाजपाला फायदा होईल असे मानले जात होते. ८ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या निकालांनतर दिल्लीची सत्ता भाजपाकडे जाणार, याचे चित्र स्पष्ट झाले होते. दिल्लीत भारतीय जनता पक्षाने ४८ तर आम आदमी पक्षाने २२ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला यंदा सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही.