Breaking News

50 % पर्यंतचे आरक्षण …. आरक्षणावरून शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘ आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून 75 टक्क्यांवर न्या’ असं शरद पवार म्हणाले. ‘ केंद्राने मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतल्यास आमचा पाठिंबा असेल’असंही त्यांनी स्पष्ट केलं. विधेयक आणल्यास आम्हीही केंद्राला पाठिंबा देऊ, असं शरद पवार म्हणाले.

आरक्षणाच्या बाबतीत असे आहे की 50 टक्क्यांच्यावर जाता येत नाही. 50 ट्क्क्यांच्या वर आरक्षण जर हवं असेल तर संसदेत कायदेशीर दुरूस्ती केली पाहिजे. काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आत्ता 50 टक्के आरक्षण आहे ते 75 टक्क्यांपर्यंत जाऊ दे. महाराष्ट्रात 75 टक्के का होऊ शकत नाही? म्हणजे आता 50 % आहे, 75% होण्यासाठी 25 ने वाढवावं लागेल. 25 % वाढवले की ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल, जिथं कमी आहे त्यांच्याबद्दलही विचार करता येईल.यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा , संसदेत विधेयक आणावं.आम्ही त्यांना साथ देऊ, असं शरद पवार म्हणाले.

मराठा आरक्षणासोबतच अन्य जे समाज आरक्षणाची मागणी करत आहेत त्यांनाही आरक्षण मिळावे आणि ते देखील कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता, अशी आपली भूमिका असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं.

‘आरक्षण मिळावं अशा प्रकारची भावना लोकांच्या मनात आहे. ते चुकीचे नाही. मात्र हे करत असताना इतरांना जे मिळतं त्याचंही रक्षण करणं, त्याला धक्का न बसणं याबद्दलही काळजी घेणं गरजेच आहे’, असं मत शरद पवार पत्रकार परिषदेत आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मांडलं.

यावेळी शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली. लोकसभा निवडणुकीत ज्यांना एकसुद्धा जागा मिळाली नाही ते लोक माझ्यावर बोलतात. त्यांचं भाष्य प्रसिद्धीसाठी असतं असं म्हणत शरद पवारांनी आंबेडकरांना टोला लगावला.