२६ जानेवारी रोजी देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजधानी दिल्ली येथे राष्ट्रपती, पंतप्रधान महोदय यांच्या उपस्थितीत होणाऱ्या परेडला उपस्थित राहण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र ते अनेकांना सहज शक्य होत असं नाही. मात्र आता या परेडला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मोठा बहुमान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका सरपंचाला मिळणार आहे. हा मान यंदा कोकणात, रत्नागिरी जिल्ह्यातील, ग्रामपंचायत पोमेंडी बुद्रुक कारवांचीवाडीच्या महिला सरपंच महोदयांना मिळाला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून एका सरपंचाला बहुमान केंद्राकडून मिळणार आहे.
रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागातील पोमेंडी बुद्रुक कारवांचीवाडी या ग्रामपंचायतीच्या सरपंच असलेल्या ममता जोशी यांची निवड केंद्र शासनाकडून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणाऱ्या दिल्लीतील परेडसाठी विशेष अतिथी म्हणून करण्यात आली आहे. यासाठी केंद्रशासनाकडून व राज्य शासनाकडून ग्रामीण पातळीवर राबवण्यासाठी असलेल्या योजना व या योजनांची अंमलबजावणी, योजनांमध्ये असलेला लोकसहभाग, त्यासाठी केलेले प्रयत्न आदी निकष निश्चित करण्यात आले होते.
केंद्र व राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीची निवड या उपक्रमासाठी करण्यात आली होती. त्यांच्याकडून यासाठी माहिती मागविण्यात आली होती. या ग्रामपंचायतीमधून जिल्ह्यातील पोमेंडी बुद्रुक कारवांचीवाडी या एकमेव ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान घरकुल योजना, उज्वला गॅस योजना, राज्य शासनाची रमाई घरकुल योजना, लाडकी बहीण योजना आदी विविध प्रकारच्या योजना, उपक्रम गावात पूर्ण क्षमतेने राबवून त्याचा लाभ नागरिकांना देण्यात आला आहे.
” आमच्या पोमेंडी गावाचं नाव दिल्लीपर्यंत पोहोचलं आहे याचा मला अभिमान आहे. या गावची लोकनियुक्त सरपंच म्हणून हा बहुमान मला मिळाला. त्याबद्दल मला खूपच आनंद होत आहे. आजपर्यंत कधीही दिल्ली पाहिली नव्हती. आपण कधी दिल्लीत जाऊ असं वाटलं नव्हत. पण योजनांमधील नागरिकांचा सहभाग विविध उपक्रम यामुळे आमच्या ग्रामपंचायतची निवड शासनाकडून करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मी गृहिणी महिला सरपंच आहे. आणि मला आज दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेड कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहता येणार आहे. याचा मला आनंद व अभिमान वाटत आहे.” अशी प्रतिक्रिया ममता अंकुश जोशी यांनी ‘महाराष्ट्र टाईम्स’ जवळ बोलताना दिली.