मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला. गोरेगावच्या नेस्को स्टेडिअममध्ये हा मेळावा आयोजित करण्यात करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांवर जोरदार टीका केली. महाराष्ट्राची धुरा माझ्याकडे आली तर महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही,.तुटणार नाही. कुणीही दिल्लीत बसू दे. आपला अभिमान आपणच जगवला पाहिजे, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
मनसेच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यातून राज ठाकरेंनी सर्वच राजकीय पक्षांवर टीका केली. यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. तर उद्धव ठाकरे यांना चार गोष्टी सुनावल्या. त्यासोबतच राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना काही मोलाचे सल्लेही दिले. तसेच विधानसभा निवडणुकांची रणनिती कशी असणार, याबद्दलचीही माहिती दिली.
“आम्हाला काय करायचं आहे. पुढच्या पिढीसाठी काय करायचं आहे. कसलाच विचार नाही. फक्त येऊन तुमच्यासमोर खोटं सांगायचं. सोशल मीडियाचं माध्यम वापरायचं. काहीवेळा चॅनलवालेही सहभागी झालेले. एक तर महाराष्ट्राची भाषा. प्रवक्ते येतात आणि काय बोलतात. घाणेरडं वाईट प्रत्येकाला बोलता येतं पण कुठे बोलता येतं याला काही तारतम्य आहे की नाही. विनोदाने कोणती गोष्ट मांडावी, कुठे मांडावी. हे काही कळतं की नाही”, असे राज ठाकरे म्हणाले.
“मला भीती या गोष्टीची भीती असते की जी लहान लहान मुलं आणि मुली पाहत असतील त्यांना वाटतं हेच राजकारण आहे. उद्या तेच दामदुपटीने शिव्या देतील मग काय राहील. सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणायचा, देशाला दिशा देणारा महाराष्ट्र म्हणायाचं ही दिशा. याला दशा म्हणतात. मी म्हटलं शरद पवार हे नास्तिक आहेत. ते देवधर्म मानत नाही. त्यांच्या मुलीने लोकसभेत सांगितलं. मी हे सांगितल्यानंतर पवार साहेब प्रत्येक मंदिरात जात आहेत. हात जोडत आहे. ते हात दाखवणंही खोटं आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी आहे”, असा आरोप राज ठाकरेंनी केला.
“निवडणुकीच्या तोंडावर ते वाट्टेल ते करतील. तुम्हाला जातीत अडकवतील. पैशाचा महापूर आणतील. निवडणुकीत जेव्हा हे पैसे वाटतील. सर्वच राजकीय पक्ष. घ्या नक्की. कारण हे तुमचेच पैसे आहेत. इथूनच लुटलेले आहे. त्यामुळे नक्की घ्या आणि मनसेच्या उमेदवाराला निवडून द्या. महाराष्ट्राची धुरा माझ्याकडे आली तर महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही,.तुटणार नाही. कुणीही दिल्लीत बसू दे. आपला अभिमान आपणच जगवला पाहिजे. कुणीही येतं आणि काहीही घेतंय”, असेही राज ठाकरेंनी यावेळी म्हटले.
“अदानी येतो विमानतळ घेतो, खार जमिनी घेतो. पोर्ट घेतो. आपल्याला काही पडली नाही. कोकणातील मोठी जमीन घेत आहे. हे सर्व उद्योगपती येणार… मी एक गोष्ट सांगतो. विश्वासाने सांगतो. तपासून पाहा. मी सतत सांगतो ना, जमिनी विकू नका. एकदा पायाखालची जमीन गेली तर तुमचं अस्तित्व राहणार नाही. गुजरातमध्ये पाहा. तिथला कायदा पाहा. शेतीची जमीन विकू शकत नाही. शेतीची जमीन विकायची असेल तर फक्त शेतकऱ्याला विकू शकता तीही राज्यातील. प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करतो. आपल्या माणसाचा विचार करतो. आपल्याकडेच फक्त प्रत्येक गोष्टीचा लिलाव केला जातो”, असेही राज ठाकरेंनी म्हटले.