मी अत्यंत खेदाने आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, गोपीचंद पडळकर आणि सदा खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील आदरणीय व्यक्तिमत्त्व शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर वेळोवेळी अतिशय खालच्या पातळीवर टीका केली आहे. अशा प्रकारच्या टीकांमुळे केवळ एका नेत्याचा नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय संस्कृतीचा अपमान होत आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी म्हटले आहे.
आपणास माहित आहे की शरद पवार साहेबांनी आपले संपूर्ण जीवन राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी समर्पित केले आहे. त्यांनी राजकारणात शालीनता आणि संयमाचे जे मूल्य रुजवले, त्याचा आदर राखणे प्रत्येक नेत्याचे कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत, पडळकर आणि खोत यांची आक्षेपार्ह भाषा आणि व्यक्तव्ये राजकीय मर्यादांचे उल्लंघन करणारी असून ती समाजात कटुता निर्माण करू शकतात.
आपण महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ नेतृत्व करीत आहात. त्यामुळे आपल्या वतीने या संदर्भात कठोर भूमिका घेतली जावी अशी अपेक्षा आहे. अशा वादग्रस्त वक्तव्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या शांतता व सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्यासाठी आपण योग्य ती कारवाई कराल अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी मुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून मागणी केली आहे.