सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीच्या बातम्या वाचून धक्काच बसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. भ्रष्टाचार, वसुली यासारख्या अनेक गोष्टी घडल्या, पण राज्य सरकारनं ठोस कारवाई केली नाही. राज्यातील परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे , सुरेश धस हे तडजोड करणार नाहीत, असा माझा विश्वास आहे, असंही सुळे म्हणाल्या.

डिपीडीसीमधील घोळाबद्दल मी संसदेत बोलले. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शब्द दिला की याबद्दल ते चौकशी लावणार आहेत. मी पाठपुरावा करणार आहे असंही सुळे म्हणाल्या. कोणत्याही सरकारने कोणावरही दबाव टाकून परिस्थिती लपवू नये, मी स्वतः 18 तारखेला बीडला जाणार आहे. देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आम्ही सोबत असल्याचा विश्वास देणार असल्याचं सुळे म्हणाल्या. कोणी कोणाशी लग्न आणि प्रेम करावं, हा घटनेने दिलेला अधिकार आहे. देशाची आर्थिक स्थिती ढासळत आहे, असे कायदे करण्यापेक्षा त्याकडं लक्ष द्यावे असे सुळे म्हणाल्या.

राहुल गांधी यांच्यासोबत माझी भेट झाली आहे. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. एकदा महापालिका निवडणुकीची नक्की तारीख ठरली की, त्यावर निर्णय होईल असेही सुळे म्हणाल्या. भाजप एकटं लढणार असल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. शत प्रतिशत अशी टॅगलाईन अमित शाह यांनी यापूर्वी दिली आहे, असं सुळे म्हणाल्या. लोकशाहीत नाराज असतील तर त्यांना बोलण्याचा अधिकार आहे .काय चुकलं काय नाही? हे लक्षात घ्यायला हवं असेही सुळे म्हणाल्या.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर देखील सुळेंनी प्रतिक्रिया दिली. त्यांचे हे वक्तव्य दुर्दैवी आहे. एवढं बहुमत मिळाल आहे. पण वाचाळवीरांची संख्या अधिक आहे असे सुळे म्हणाल्या. यशवंतराव चव्हाण यांचे फोटो बॅनरवर लावले जातात पण त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे असंही सुळे म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *