kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पुरुषोत्तम खेडेकर यांचा अमृत महोत्सवा निमित्त विशेष गौरव ; केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

“देशात विचार भिन्नता ही समस्या नाहीये. तर विचार शून्यता ही समस्या आहे. आपली कशा सोबत बांधिलकी आहे, हे लोकांना माहीत असले पाहिजे. पक्षात आणि संघटनेमध्ये कार्यकर्त्यांचा माणुस म्हणून विचार करायला हवा जो केला जात नाही. अलीकडे सत्ता येईल तिकडे नेते पळतात, सत्ता गेली की तिथून दुसरीकडे उड्या मारतात, जीवनात पैसा हा महत्त्वाचा असला तरी सर्वस्व नाही. त्याच प्रमाणे आरोग्यालाही महत्त्व द्यायला हवे” असे मत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. मराठा सेवा संघ व युगनायक मा. पुरुषोत्तम खेडेकर अमृत महोत्सव गौरव समिती यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर अमृतमहोत्सवा निमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात नितीन गडकरी बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय घोगरे (अध्यक्ष मराठा सेवा संघ,महाराष्ट्र,अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर अमृत महोत्सव समिती) होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, पुरुषोत्तम खेडेकर, आमदार रेखा खेडेकर,माधवराव पाटील शेळगावकर, ज्येष्ठ कवि इंद्रजित भालेराव, कर्नाटक मधील आमदार डॉ. मारोतराव मुळे, माजी आयपीएस अधिकारी विक्रम बोके, व्यंकटराव गायकवाड (निवृत्त सचिव जलसंपदा विभाग), हेमंतकुमार देशमुख (मुख्य अभियंता), विठ्ठलराव गायकवाड, गिरीश जोशी (मुख्य अभियंता, अमरावती), आमादार शंकर जगताप, राजेंद्र पवार, रवींद्र माळवदकर, माजी आमदार विलास लांडे,राजेंद्र डूबल आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मदन पाटील लिखित ‘क्रांतीपुरुष पुरुषोत्तम खेडेकर’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, समाजातील अस्पृश्यता, जातीयता, विषमता संपुष्टात आली पाहिजे. कारण तुमची गुणवत्ताच तुम्हाला श्रेष्ठ बनवते. ज्यामुळे जातपात, भाषा, राज्य आणि पंथाच्या पलीकडे जावून तुम्हाला ओळख मिळते. ही गुणवत्ता ज्ञानातून मिळते. आज जर भारताला विश्वगुरू बनायचे असेल तर ज्ञान महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

मी माझ्या आई – वडिलानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. कारण प्रत्येक पायंड्यांवर त्यांच्या सारखा आदर्श राजा दुसरा कोणी नाही. ते खऱ्या अर्थाने सेक्युलर होते. कारण सर्वधर्म समभाव असणारे ते एकमेव राजे होते. त्यांनी स्वराज्याचा विस्तार करताना दुसऱ्या धर्माची प्रार्थनास्थळे पाडली नाहीत, कोणत्याही महिलांवर अन्याय, अत्याचार केले नाहीत असेही गडकरी यांनी नमूद केले.

सत्काराला उत्तर देताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या कार्याचा आढावा घेतला, एक शासकीय अधिकारी म्हणून काम करताना आलेल्या अडचणी आणि त्यावर मात करून सामाजिक संघटन कसे वाढविले व नोकरीत असताना तरुणांना रोजगाराच्या संधी कशी उपलब्ध करून दिल्या याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगाधर बनबरे यांनी केले. ‘क्रांतीपुरुष पुरुषोत्तम खेडेकर’ या गौरव ग्रंथाचे विवेचन इंद्रजीत भालेराव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा खेडेकर यांनी केले तर कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना – अनुश्री पाटील यांच्या जिजाऊ वंदनेने झाली.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौरभ खेडेकर,संतोष शिंदे,उत्तम कामठे,अविनाश मोहिते,चंद्रशेखर घाडगे,मनोज गायकवाड,अविनाश घोडके,प्रशांत धुमाळ यांनी केले.