महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप प्रणीत महायुती सरकार स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे. उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिवसेनेचे (शिंदे गट) ज्येष्ठ मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शपथविधी सोहळ्यापूर्वी मुख्यमंत्रिपदासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चुरशीची लढत होत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाली. यात भल्याभल्यांचा अंदाज फोल ठरवून महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. २३६ जागांवर दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीचा पार सुपडा साफ केला आहे. निकालानंतर महायुतीमध्ये आता सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू असून मंत्रिपदावरुन घोडं अडण्याची शक्यता आहे. आधीच्या सरकारप्रमाणेच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पुढच्या सरकारमध्येही असणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, शपथविधी सोहळ्यात केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेतील. मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांच्या नावांवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. शिवाय युतीतील घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतरच मुख्यमंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. ‘मुख्यमंत्र्यांबाबत कोणताही वाद होणार नाही. निवडणुकीनंतर तिन्ही पक्षांचे नेते मिळून निर्णय घेतील, हे पहिल्या दिवसापासून निश्चित झाले आहे. महायुतीने २८८ पैकी २३६ जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले. भाजपने १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल, असे म्हणत विरोधकांनी शिंदे यांच्यावर मुख्यमंत्रिपदावरून निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रिपदासाठी बराच काळ संघर्ष सुरू आहे. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सत्तावाटपावरून मतभेद झाल्याने भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र, २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्याविरोधात बंड करून त्यांच्यासोबत अनेक आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्याविरोधात बंड ठोकून शिंदे सरकारला पाठिंबा दिला.
महायुतीत संभाव्य मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ६ ते ७ आमदारांच्या मागे एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे सध्या १३२ आमदार असल्याने त्यांना २१ ते २२ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.शिवसेने शिंदे गटाला ५७ जागा आल्याने त्यांच्या वाट्याला १० ते १२ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाला ४१आमदारांमागे ८ ते १० मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.