शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचा विचार हा देशाच्या लोकशाहीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मा आहे. आत्म्याशिवाय कुणीही जिवंत राहू शकत नाही त्यामुळे हा विचार आपला पक्ष कदापी सोडणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देशातल्या व राज्यातील जनतेला दिला. १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ वा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात मोठया उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

नव्या दमाने, नव्या जोमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून विधानसभेला सामोरा जाणार असून एकदिलाने मोठी भरारी घेताना राष्ट्रवादीची पताका फडकवण्याचा संकल्प अजितदादा पवार यांनी व्यक्त केला. शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचे विचार हीच राष्ट्रवादीची विचारधारा होती आणि यापुढेही राहिल असेही अजितदादा पवार यांनी ठणकावून सांगितले. बळीराजासोबत जोडलेला… शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीची ओळख आहे. युवक, महिला, मागासवर्गीय, मुस्लिम, आदिवासी,भटके विमुक्त अशा सर्व समाजघटकांना पक्षाने जोडून ठेवले आहे. शिवाय या घटकांना सरकारमध्ये प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केला आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

तसेच, अजितदादा महाराष्ट्राच्या मनातील भावना, दु:ख जाणतात. राज्यातल्या प्रश्नांची त्यांना समज आहेच शिवाय प्रश्न सोडवण्याची धमकही आहे त्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी वाटचाल करत राहिल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात नवीन अजितपर्व सुरु झाले असून हे विश्वासार्हतेचे पर्व आहे विश्वासघाताचे नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले. सर्व घटकांना सर्व समाजाला सोबत घेत शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या वैचारिक अधिष्ठानापासून तसुभरही बाजुला न होता यापुढची गौरवशाली वाटचाल करणार असल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. ‘एकच लक्ष्य, विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेऊन आपल्याला काम करायचे आहे. आपला स्ट्राईक रेट किती आहे हे अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला दाखवायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत हे चित्रही आपल्याला प्रस्थापित करायचे असून जिद्दीने कामाला लागा असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचे आम्हीच वारसदार आहोत असा धिंडोरा पिटणारे सोशल मिडियावर ज्या पद्धतीने व्यक्त होत होते हे चिंताजनक होते असा टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला. पराजयाने नाउमेद होऊ नका. जनतेसाठी २४ तास काम करणारा नेता आपल्या पाठीशी उभा आहे हे लक्षात ठेवा असे सांगतानाच संसदरत्न असलेल्या लोकांना पहिल्या रांगेत अजितदादा बसलेले होते हे बघवत नव्हते त्यामुळे त्यांची पोटदुखी वाढलेली दिसली अशी खोचक टिकाही सुनिल तटकरे यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करत असून आपल्याला सर्व जातीतील घटकांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. ज्या विचारांवर आपण काम करत आहोत ते विचार यापुढेही प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देऊ त्यांच्या मनात पुन्हा एकदा विश्वास निर्माण करु अशा शब्दात अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांसमोर आपले विचार मांडले. न पूछो मेरी मंजिल कहाँ है… अभी तो सफर का इरादा किया है… ना हारुंगा हौसला उम्रभर… ये मैने किसी से नही खुद से वादा किया है अशा शायरी अंदाजात छगन भुजबळ यांनी आपला इरादा स्पष्ट केला.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला ऐतिहासिक विजय मिळवायचा असून लोकसभा निवडणुकीत पराभवाचं शल्य विधानसभा निवडणुकीत ठासून भरुन काढू असा विश्वास कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी मंत्री बाबा सिद्दीकी, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ आदींनी आपले विचार मांडले.

या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, क्रीडामंत्री संजय बनसोडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, पक्षाचे नेते शिवाजीराव आढळराव, मुश्ताक अंतुले, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, माजी मंत्री बाबा सिद्दीकी, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदींसह सर्व आमदार, पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.