मुघल बादशाहा औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, असं म्हणत त्याचं कौतुक करणाऱ्या अबू आझमी यांच्यावर भाजपा आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे. अबू आझमी यांना औरंगजेबाची एवढीच आठवत येत असेल, तर औरंगजेबाच्या कबरीशेजारीच अबू आझमी यांच्यासाठी कबर खोदून ठेवू, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
यावेळी नितेश राणे पुढे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांचे औरंगजेब बादशाहाने कशा प्रकारे हाल केले होते, हे आज संपूर्ण जग पाहत आहे. स्वराज्याची लढाई ही इस्लामविरोधातच होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करून औरंगजेबाविरोधात लढा दिला. त्यावेळी सेक्युलर नावाचा शब्द अस्तित्वात नव्हता. हा शब्द काँग्रेसने रुढ केला आहे, असा दावाही नितेश राणे यांनी केला.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबांमध्ये धर्माची लढाई नव्हती असा दावा अबू आजमी यांनी केला होता. ते म्हणााले होते की, “औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मापर्यंत होती. त्या काळात आपला जो जीडीपी होता तो २४ टक्के होता. भारताला ‘सोने की चिडिया’ म्हटलं जायचं. या सगळ्या गोष्टींना मी चुकीचं म्हणू का, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई ही सत्तेसाठी होती. ही लढाई धर्मासाठी होती हे जर कोण बोलत असेल तर ते मी मानत नाही, असा दावा अबू आझमी यांनी केला होता. त्यांच्या वक्तव्यावरून चांगलाच वाद झाला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी केली होती.
आता चौफैर टीका होऊ लागल्यानंतर अबू आझमी यांनी आज आपलं विधान मागे घेतलं. “माझ्या विधानाची मोड-तोड करून ते दाखण्यात आलं. औरंगजेब यांच्याबद्दल मी तेच वक्तव्य केलं जे इतिहासकारांनी आपल्यासमोर मांडलं आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा अन्य कुठल्याही महापुरुषाबद्दल कोणत्याही प्रकारचं अपमानजनक वक्तव्य केलं नाही. तरीदेखील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. माझ्या वक्तव्याला राजकीय वळण दिलं जात आहे. माझ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अधिवेशन तहकूब होणं महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे जनतेचं नुकसान होतंय,” असं आझमी म्हणाले.