kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

नाशिक कुंभमेळ्यासाठी बजेटमध्ये एक रुपयाही नाही – जयंत पाटील

नाशिक इथं होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने निधीची तरतूद न केल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी आज सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. “महाराष्ट्रातील नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा येऊ घातलेला आहे. एवढ्या मोठा बजेटमध्ये या कुंभमेळ्यासाठी एकही रुपया दिलेला नाही. या मेळाव्याबद्दल सरकार उदासीन आहे का?” असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केला आहे. तसंच कुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिक शहरामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर झाला. ज्याची निविदा प्रक्रिया पारदर्शक नाही असा आरोप खुद्द सत्तारूढ पक्षातील सदस्यांनी केलेला आहे. यावर सरकारने लक्ष घालावे, असं आवाहनही पाटील यांनी केलं.

जयंत पाटील यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्यातील अन्य प्रश्नांवरूनही सरकारला धारेवर धरलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “ओबीसी महामंडळाला फक्त ५ कोटी देण्याचे पाप या सरकारने केले आहे. ओबीसींची घोर फसवणूक होत आहे. राज्यात ५५ लाख ६६ हजार ९२१ केसेस पेंडिंग आहेत. यासाठी सरकार कोणता दृष्टिकोन दाखवणार? कायदा आणि सुव्यवस्था विभागासाठी दिलेल्या बजेटच्या फक्त एक टक्का रक्कम खर्च झाली आहे. ही आकडेवारी धोकादायक आहे. कायदा व सुव्यवस्था राहूच नये अशी सरकारची मानसिकता आहे का?” असा सवाल पाटील यांनी विचारला.

दरम्यान, “सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत हजारो कोटींची टेंडर काढली जातात. हे टेंडर्स ३५ ते ४० टक्के इतक्या चढ्या दराने जातात. भूमी अधिग्रहण आणि केंद्र सरकारच्या इतर परवानग्या न घेता काही रस्त्यांचे टेंडर निघतात. ठराविक चार कंपन्यांनी टेंडर भरतात. रस्ते बांधणीचा इतका अट्टाहास का आहे? त्याचे मूळ या गैरव्यवहाराशी जोडले गेले आहे का?” असा हल्लाबोलही जयंत पाटलांनी केला आहे.