राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात टीका करत, हे सरकार महाराष्ट्रासाठी नसून दिल्लीच्या इशाऱ्यावर चालते आहे असा घणाघात केला आहे.

“आज राज्य सरकारमध्ये एका पाठोपाठ एक मंत्री नाराज होत आहेत. उद्योग मंत्री म्हणतात, ‘आमच्या खात्यातील निर्णय आम्हाला विचारत नाहीत!’ परिवहन मंत्री म्हणतात, ‘माझ्या खात्यात कोण बसवलं जातं, मलाच विचारत नाहीत!’ आणि मुख्यमंत्री मात्र म्हणतात – ‘मी ठरवतो कोणाला थारा द्यायचा आणि कोणाला नाही!’ मग, या सरकारमध्ये नेमकं ठरवतो कोण?” असे म्हणत , “हा सारा प्रकार पाहता, हे सरकार ‘महायुती’ नाही, तर ‘महाभानगडी’ झाली आहे! मंत्रीच जर अस्वस्थ असतील, तर सामान्य जनतेच्या प्रश्नांवर विचार करायला कोणाला वेळ आहे? मुख्यमंत्री साहेब, जेव्हा तुम्हाला खुर्ची मिळाली नव्हती तेव्हा तुम्ही अस्वस्थ होता, आणि आता खुर्ची मिळाल्यावर सगळ्यांना अस्वस्थ करून ठेवलंय!”‘एक गाडी, चार ड्रायव्हर – आणि ब्रेक कोणाच्या हातातच नाही!’असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी म्हटले आहे.

आणखी काय म्हणाले ॲड. अमोल मातेले ?

“आज या सरकारमध्ये कोण निर्णय घेतं आणि कोण पाळतं, हेच कोणालाच माहीत नाही. हे सरकार म्हणजे एकाच गाडीत चार ड्रायव्हर बसल्यासारखं आहे, पण ब्रेक कोणाच्या हातात आहे हे अजूनही स्पष्ट नाही! त्यामुळे निर्णय कधी अचानक थांबतात, कधी फुल स्पीडने कुणाला तरी चिरडून जातात. आणि शेवटी महाराष्ट्राची जनता विचारते – हे सरकार महाराष्ट्रासाठी आहे की दिल्लीसाठी?”

“महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणाऱ्या प्रत्येक जबाबदार नागरिकाने या हुकूमशाही सरकारविरोधात आवाज उठवायला हवा. राज्याच्या निर्णयांवर दिल्लीचा अघोषित ताबा असून, महाराष्ट्राची सत्तासंस्था कशी हाताळायची हे दिल्लीच्या नेत्यांकडून ठरवलं जातं, ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे. हे सरकार महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेणार नाही, तर अराजकतेच्या दिशेने ढकलणार आहे!”

“जनतेला आता ठरवायचं आहे – महाराष्ट्राच्या विकासासाठी उभं राहायचं की दिल्लीच्या बाहुल्यांचा खेळ पाहायचा!”