kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

जे योजनेच्या क्रेडिटवरून भांडतात, ते आम्हाला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असे विचारत आहेत – आदित्य ठाकरे

‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमच्याकडे उद्धव ठाकरे यांचा चेहरा आहे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास असून, नागरिक त्यांना पालक म्हणून पाहत आहेत. मात्र महायुतीकडे कोणता चेहरा आहे? जे योजनेच्या क्रेडिटवरून भांडतात, ते आम्हाला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असे विचारत आहेत’, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी टीकास्त्र सोडले.

एका वाहिनीच्या परिसंवादात आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांना लक्ष्य केले. आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले. ‘महायुतीकडे कोणता चेहरा आहे? अर्थात ते जिंकणार नाहीच. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा घेऊन ते जाणार आहेत का? त्यांचे सरकार असल्याने या प्रश्नाचे त्यांनी उत्तर द्यावे. आम्ही आमची भूमिका मांडली असून उद्धव ठाकरे हा आमचा चेहरा आहे’, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

‘सर्वात जास्त जागांसह बहुमताचे महाविकास आघाडीचे सरकार येईल. आम्ही सर्वजण महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत. महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढत आहोत’, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. ‘आमचा आग्रह एकच आहे, तो म्हणजे बदल झाला पाहिजे. सध्या महाराष्ट्र द्वेष्टे सरकार आहे. मिंधे कधीही निघून जातील. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल. ज्यांनी निर्लज्जपणे गद्दारी केली ते जातील’, असेही ते म्हणाले. ‘निवडणुकीत अनेक उमेदवार उतरतात. १५ ते २० उमेदवार निवडणूक लढवतात. अनेक लोक येत असतात. पाच वर्षे सातत्याने काम करणारे काही पक्ष असतात. तर काही पक्ष निवडणुकीला जागे होतात. मी मनसेवर टीका करणार नाही. मी वरळीतूनच लढणार आहे’, असे म्हणत त्यांनी मनसेला लक्ष्य केले.

‘आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पाहत नाहीत. शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची अलीकडच्या काळातील वक्तव्ये पाहता उद्धव ठाकरे हा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नसावा,’ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.

एका चॅनलच्या परिसंवादात ते बोलत होते. या वेळी देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या स्पर्धेबाबत विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे मध्यंतरी तीन दिवस दिल्लीला गेले होते. मुख्यमंत्रिपदासाठी ‘मविआ’ने त्यांचा चेहरा पुढे करावा, हा त्यांचा प्रयत्न होता. एरवी आम्ही दिल्लीत गेलो, की ठाकरे आमच्यावर किती टीका करतात. किंबहुना आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे; पण उद्धव ठाकरे दिल्लीत गेले तेव्हा त्यांची सोनिया गांधी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीचा एकही फोटो बाहेर आला नाही. सोनिया गांधी यांनी ठाकरेंना एकही फोटो काढू दिला नाही,’ असा दावा फडणवीस यांनी केला.