मालवण समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी भव्य पुर्णाकृतीपुतळा सोमवारी कोसळला. नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३ पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण पार पडलं होतं. केवळ ८ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने राज्यभरातील शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी उद्या (बुधवार) मालवणमध्ये विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रत्येक शिवप्रेमी नागरिकांच्या मनात उफाळलेला तीव्र संताप सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तसेच या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल सर्व दोषींना शिक्षा करावी, या मागणीसाठी हा मार्चा काढण्यात येणार आहे. बुधवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी १०. ०० वाजता मालवण भरड दत्तमंदिर येथून बाजारपेठ मार्गे तहसिलदार कार्यालयावर हा जनसंताप मोर्चा धडकणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झालेला शिवरायांचा पुतळा एक वर्षाच्या आताच कोसळल्याने याच्या बांधकामाच्या दर्जावर सवाल उपस्थित केले जात आहेत. सरकार व प्रसासनाच्या या भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी मालवणात जनसंताप मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसंताप निषेध मोर्चात शिवप्रेमी नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन शिवसेना शाखा मालवण, महाविकास आघाडी व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.