राजापूर विधानसभेत माजी आमदार राजन साळवी यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आता कोकणात एकनाथ शिंदेंची ताकद वाढली आहे.
राजन साळवी यांनी बुधवारी शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत आणि संघटनेतील अंतर्गत राजकारणात मी माझ्या पदाला न्याय देऊ शकणार नाही. माझ्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा देत आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह किनारपट्टीवरील कोकण हा एकेकाळी ठाकरे यांच्या पक्षाचा बालेकिल्ला होता.
राजन साळवी काय म्हणाले?
शिंदेंच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर साळवी म्हणाले की,’माझ्या दोन्ही डोळ्यात आज अश्रू आहेत. ३८ वर्ष शिवसेनेत असताना नगरसेवकापासून विविध जबाबदाऱ्या संभाळल्या. या संपूर्ण वाटचालीत तो पक्ष सोडून नवीन घरात यावे लागत आहे. त्यामुळे एका डोळ्यात दु:खाचे अश्रू आहेत. तर, दुसऱ्या डोळ्यात आनंदअश्रू आहेत. कुटुंबात परत येत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत जाऊ शकलो नाही. ही खंत आहे. पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती.’
कोण आहेत राजन साळवी?
राजन साळवी यांनी कोकणातील राजापूर विधानसभेत तीन वेळा आमदारकी जिंकली. त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेपासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतरर १९९३ ते १९९४ साली त्यांनी शिवसेनेत सक्रीय झाले. पहिल्यांदा शिवसेनेचे नगराध्यक्षपद भूषवले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर साळवी आणि त्यांच्या पत्नीच्या मागे प्रतिबंधक विभागाचा ससेमिरा लागला. मात्र, विधानसभा निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांनी मदत न केल्यामुळे राजन साळवी नाराज झाले. अखेर आज साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.