राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार विजय मिळवला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने १३० हून अधिक जागा मिळवल्या आणि देवेंद्र फडणवीस पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. आज मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल नागपूरात फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. सुप्रिया सुळे यांनी तीन वर्षांपूर्वी “अकेला देवेंद्र क्या करेगा?” म्हणत केलेल्या टीकेला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
या सत्कार समारंभात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपण सगळे कामाला लागलो आणि हा महाविजय मिळाला. आज सत्कार जरी मंचावरील लोकांचा होत असला तरी तो तुमच्या सर्वांच्या वतीने स्वीकारत आहोत. भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही स्वीकारतोय. कारण कार्यकर्त्यांचे प्रतिक म्हणून आम्ही या ठिकाणी बसलो आहोत. एकदा सुप्रिया ताई असे म्हणाल्या होत्या की, अकेला देवेंद्र क्या करेगा? सुप्रिया ताईंचे म्हणणे खरे होते. अकेले देवेंद्र की कोई औकात नही है, अकेला देवेंद्र कुछ नही कर सकता. पण त्यांना त्यावेळी माहित नव्हते देवेंद्र एकटा नाही त्याच्याबरोबर संपूर्ण भारतीय जनता पार्टी आहे.”
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
तीन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, “अकेला देवेंद्र क्या करेगा?” आज तीन वर्षांनी देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या या टीकेला उत्तर दिले आहे.