मी एखाद्याचा काटा काढायचा म्हटल्यावर काढतो. मी निवडणुकीत पाडतो; पण एखाद्याला खासदार करायचा म्हटल्यावर करतो; पण तसा तुमच्या शब्दाचा पक्का आहे. पाणी देण्यासाठी मी प्रयत्न करीन, असा शब्द देतो असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले . छत्रपती सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या जय भवानी पॅनलच्या प्रचारार्थ अकोले येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

यावेळी त्यांनी सांगितले, खडकवासला कालव्यावरील पाणी गळती रोखण्यासाठी बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी देण्याची गरज आहे. यावेळी सभेत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, पृथ्वीराज जाचक, तसेच निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार व अकोले येथील पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, खडकवासला कालव्यावरील शेतकऱ्यांना प्रत्येकवेळी पाणी संकटाला सामोरे जावे लागत असल्याने नाराजी वाढत चालली आहे. मात्र, पुणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन उर्वरित पाणी शेतीसाठी देण्याचे नियोजन करण्यात येते. पाणी टेल टू हेड कमी पडत असल्याने मुळशी धरणातून पाणी खडकवासला कालव्याला देण्याचा विचार असून त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने बंद पाइपलाइनमधून पाणी देऊन, तसेच कालव्याला होणारी गळती थांबवून हेडपर्यंत पाणी देण्याचे नियोजन करण्याचे विचाराधीन आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे. खडकवासला कालव्यातून ११०० क्युसेकनी सोडलेले पाणी टेलपर्यंत म्हणजेच इंदापूरपर्यंत २३० क्युसेकनी पोहोचते. यामुळे पाणी गळती रोखून भविष्यात कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी बचत करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले. छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी जय भवानी पॅनलला मतदान देण्याचे आवाहन सभासदांना केले. तसेच कारखाना उसाला चांगला दर कसा देता देईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *