भारत-पाकिस्तान तणाव आता निवळला आहे. यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठा दावा केला आहे. देशाच्या नागरिकांची पाकव्याप्त काश्मीरवर भारताने ताबा मिळवावा, अशी इच्छा आहे. त्यामुळे आपणदेखील संसदेत आपल्याला पाकव्याप्त काश्मीर हवं असल्याची मागणी केली आहे, असं रामदास आठवले यांनी सांगितले. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत चांगली भूमिका घेतली आहे. पाकिस्तानचं सरकार दहशतवाद्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना पूर्णपणे पाठबळ देत होतं. पहलगामध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांची हत्या केली. ज्यांनी महिलांच्या कपाळाचे कुंक पुसले त्यांना संपवण्यासाठी मोदींनी निर्णय घेतला. आपण जबरदस्त हल्ला केला. दहशतवादी अड्डे उध्वस्त करण्यात आले. सिंधू नदीचं पाणी बंद केलं. त्यामुळे पाकिस्तान रडकुंडीला आला आणि पाकिस्तानने आम्हाला युद्ध करायचं नाही अशी भूमिका घेतली. आम्ही हार मानत असल्याचे पाकिस्तान म्हणाले”, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली.
“पाकव्याप्त काश्मीर आम्हाला सोपवा, अशी मागणी देशवासियांनी केली आहे. देश मोदींच्या सोबत आहे. विरोधक सोबत असल्याचे सांगून पुरावे मागत आहेत. पाकव्याप्त काश्मीर मिळावा अशी भूमिका मी लोकसभेत मांडली आहे. आता अंतिम फैसला झाला पाहिजे”, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली
“भारत-पाकिस्तान युद्दविराम करताना कुणाचाही दबाव नव्हता”, असं रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं. “कोणताही दबाव नाही. युद्ध थांबलं असलं तरीही पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भूमिका मांडली की, आम्हाला युद्ध नको. कुणाच्या दबावाखाली निर्णय घेण्यात आला आहे”, असं रामदास आठवले म्हणाले.
रामदास आठवले यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबतही विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. “महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने आम्हाला जागा सोडल्या पाहिजे, अशी आमची मागणी आहे. निवडणूक महायुती म्हणून लढवली पाहिजे अशी भूमिका माझ्या पक्षाची आहे. वेगळं लढल्यास आपलं नुकसान आहे”, अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली.