महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज प्रशासकीय बदल्यांबाबत मोठा निर्णय जाहीर केला. “यापुढे अधिकाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाने आणि ऑनलाईन पद्धतीने केल्या जातील. या निर्णयामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता येईल”, असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केला. “यापूर्वी 10 ते 20 टक्के बदल्या हव्या तशा होत होत्या. मात्र, आता समुपदेशनाने बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक अधिकाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन, 550 प्रशासकीय बदल्या केल्या जात आहेत. आजारी अधिकारी, विधवा महिला आणि पती-पत्नी एकत्र काम करू इच्छिणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल”, असे पंकजा मुंडेंनी म्हटले.
यावेळी पंकजा मुंडेंना ठाकरे आणि पवार घराण्यातील एकत्रित भेटीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. “मी सर्वांच्या जवळची आहे. माझे वडील (गोपीनाथ मुंडे) असते, तर त्यांनाही आनंद झाला असता. मी कोणाला काय करावे, हे सांगू शकत नाही. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि त्यांच्या वेदना त्यांनाच माहीत असतात. त्यामुळे मी सूचना आणि सल्ले देण्याच्या भूमिकेत नाही. मात्र, सर्वांनी आपापल्या जागी आनंदाने आणि सुखाने काम करावे, अशी माझी इच्छा आहे.” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
“जिथे अधिकारी चुकीचे काम करत असतील, त्यांना माझ्याकडे अजिबात माफी नाही. निवडणुका आल्यावर स्वबळावर लढायचे की महायुती म्हणून यावर चर्चा होईल. सध्या आम्ही महायुती म्हणून आहोत. महानगरपालिका निवडणुकीत ओबीसींवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.” असेही पंकजा मुंडेंनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत हेलिकॉप्टरमधून कार्यक्रमाला न पोहोचू शकल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी दिलगिरी व्यक्त केली. “पवार साहेबांनी तक्रार केली होती. आज आम्ही हेलिकॉप्टरने एकत्र येणार होतो. मात्र, ते आधीच पोहोचल्याने मला त्यांच्यासोबत जाता आले नाही. ढगाळ वातावरणामुळे मला रस्त्याने यावे लागले,” असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.