Breaking News

काटोल विधानसभा मतदारसंघात अनिल देशमुख यांच्याऐवजी पूत्र सलील देशमुख काटोलमधून निवडणूक लढणार ?

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आता शेवटचे दोन दिवस राहिले असताना राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी घडत आहेत. काटोल विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमख यांनी अर्ज भरण्याआधीच निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांना पहिल्या यादीतच पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र सलील हे उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे.

अनिल देशमुख यांच्याऐवजी त्यांचे पूत्र सलील देशमुख काटोलमधून निवडणूक लढणार आहेत,यासाठी सलील देशमुख उद्या अर्ज दाखल करणार आहेत. सलील देशमुख यांचे ‘चला उमेदवारी भरायला’ असे आवाहन करणारे निवेदन समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. देशमुख यांच्या माघारीने या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

पुत्र सलिल देशमुख निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि त्यांच्या घराण्यातील वाद संपला.सलील देशमुख यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी वडिलांकडे आग्रह धरला होता. त्यांनी मतदारसंघात प्रचारही सुरू केला होता. देशमुख कारागृहात असताना त्यांनी सलिल देशमुखांनी मतदारसंघात संपर्क वाढवला होता. २०१९ च्या निवडणुकीतही हीच स्थिती होती. पण देशमुख यांनी तेव्हा ठाम भूमिका घेत स्वत: निवडणूक लढवली होती. यावेळी देशमुख यांनी माघार का घेतली हे अद्याप कळू शकले नाही. मात्र त्यांच्या माघारीमुळे राजकीय समीकरणे बदलणार हे निश्चित आहे.

काटोल विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सलिल देशमुख हे अधिकृत उमेदवार असतील. मात्रकाटोलमधून महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाही.