उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांडानंतर लव्ह जिहादचा आरोप कऱणाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. लव्ह जिहाद केलं म्हणून मारायचं आणि पुजाऱ्याने केल्यावर सोडायचं असं नाही अशा शब्दांत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही धर्माचा, जातीचा असला तरी तात्काळ शिक्षा झाली पाहिजे असंही त्या म्हणाल्या आहेत. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलिसांना तुमची दहशत दाखवा असं आवाहनही केलं.

काहीजण लव्ह जिहादचा आरोप करत असल्याबद्दल विचारलं असता शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, “याच्यात धर्म आणू नका, आपल्या हिंदू पुजाऱ्यानेही केलं आहे. दुसरी केस मंदिरात घडली असून अती लाजिरवाणी आहे. हे काम करणाऱ्या पुरुषांना धर्म नसतो. कोणत्याही धर्माचा, जातीचा असला तरी तात्काळ शिक्षा झाली पाहिजे. लव्ह जिहाद केलं म्हणून मारायचं आणि पुजाऱ्याने केल्यावर सोडायचं असं नाही. त्यालाही तितकीच कडक शिक्षा झाली पाहिजे”.

मंदिरात पुजारीही असं करत असतील तर त्यांच्यावर पोलिसांची दहशत असली पाहिजे. पोलीस काय करतात हे कळल्याशिवाय हे असले पुरुष थांबणार नाहीत, शक्ती कायदा 10 वर्षांपासून अंमलात आणलेला नाही. तो बासनात गुंडाळून ठेवला आहे. तो एका वर्षात संमत करावा अशी आमची पंतप्रधानांकडे मागणी आहे. असा गुन्हा झाल्यास 2 महिन्यात त्याला फाशीच दिली पाहिजे. हायकोर्टातून सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती असा वाव नसावा. त्यांना न्याय मिळता कामा नये अशी शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत.

“तीन घटना घडल्या असून हे फार लाजिरवाणं आहे. महिला सुरक्षित असणं पोलिसांची जबाबदारी आहे. आम्ही पोलिसांवर प्रचंड नाराज आहोत. सर्व मुलींचं रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिसांना या केसेसमध्ये कोणताही राजकीय पक्ष अडवणार नाही. जसं पोर्शमध्ये झालं की कोणीतरी आमदार आला, तसं यामध्ये कोणीही तुम्हाला अडवणार नाही. तुम्ही तुमची दहशत दाखवा. गुन्हेगारांना पोलिसांच्या भितीने गुन्हा करणं टाळलं पाहिजे,” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत. जर एखादा राजकीय पक्ष मध्यस्थी करत असेल तर पोलिसांनी त्यांची नावं उघड करावीत असंही त्या म्हणाल्या.

“निर्भया प्रकरणात 16 वर्षाचा मुलगा सुटला ते चूकच होतं. ज्या मुलाकडे इतकी विकृती आहे तो कितीही वयाचा असला तरी आत ठेवला पाहिजे. मी तर म्हणते फाशी दिली पाहिजे. वर्षानुवर्षं पडलाय आणि तुरुंगात फुकटचा भत्ता खातोय असं नको व्हायला. तुमचा भत्ता प्रेमाने द्या अशी विनंती पोलिसांना केली आहे,” अशी मागणीच शर्मिला ठाकरे यांनी केली आहे.