राज्यात 15 जानेवारीला 29 महापालिकांसाठी मतदान करण्यात आलं आहे. आज या 29 महापालिका मतदानाच्या मतमोजणी सुरू आहे. सकाळी दहा वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील 29 महापालिकेत कोणाचा महापौर बसणार हे अवघ्या काही तासात स्पष्ट होणार आहे.
निकालासाठी प्रशासन सज्ज
महापालिका निवडणूक 2026 च्या मतदानानंतर आता मतदारांचं लक्ष मतमोजणीकडं लागलं आहे. आज सकाळी 10 वाजता महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. या मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही निगराणी, तसंच अग्निशमन आणि वैद्यकीय पथक तैनात करण्यात आलं आहे, अशी महिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
‘या’ लढती ठरणार लक्षवेधी
प्रमुख प्रभागांतील काही पॅनेलमधील लढती अत्यंत प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी मनसेत प्रवेश केला. त्यांच्याविरोधात भाजपचे समीर चिटणीस आणि नंदू म्हात्रे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपचे प्रकाश भोईर आणि मनसेचे संदेश पाटील यांच्यातही चुरस होईल. प्रभाग क्रमांक २९ मध्ये शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि रवींद्र पाटील यांची भाजपच्या मंदार टावरे आणि अलका म्हात्रे यांच्यात चुरस होईल. प्रभाग क्रमांक ६ (कल्याण) येथे शिंदे गटाचे संजय पाटील तर ठाकरे गटाचे उमेश बोरगावकर आमने-सामने आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक २०, १२ (क), ७ (क) आणि ८ (क) येथील लढती देखील लक्षवेधी ठरणार आहेत.












