झारखंडमध्ये खासगी एअर अॅम्ब्युलन्सला झालेल्या भीषण अपघातात सर्व सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती चतरा जिल्ह्याच्या पोलिस उपायुक्त कीर्तीश्री यांनी माध्यमांना दिली. मृतांमध्ये दोन चालक सदस्य, एक रुग्ण आणि डॉक्टरांचा समावेश आहे. हे विमान सोमवारी २३ फेब्रुवारीच्या रात्री झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील सिमरियाजवळ कोसळले
नेमकं काय घडलं ?
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेल्या वृत्तानुसार, रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ही एअर अॅम्ब्युलन्स संध्याकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावरून रुग्णाला घेऊन दिल्ली कडे रवाना झाली होती. उड्डाण केल्यानंतर हे विमान रडारवर दिसत नसल्याचे वृत्त समोर आले होते. कोलकाता हवाई वाहतूक नियंत्रण केंद्राशी संपर्क साधल्यानंतर खराब हवामानामुळे मार्ग बदलण्याची विनंती करण्यात आली होती. संध्याकाळी ७ वाजून ३४ मिनिटांच्या सुमारास कोलकाता हवाई वाहतूक नियंत्रण केंद्राशी शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर वाराणसीपासून सुमारे १०० नॉटिकल मैलांवर विमानाचा संवाद आणि रडार संपर्क खंडित झाला.दरम्यान, काही वेळानंतर या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली.
घटनास्थळी एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे (एएआयबी) पथक दाखल झाले असून अपघाताचा तपास सुरू करण्यात आल्याचे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून सांगण्यात आले आहे. खराब हवामानामुळे विमानाचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चौकशीअंती याबाबत अधिक माहिती समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटली असून, पायलट-इन-कमांड कॅप्टन विवेक विकास भगत आणि सह-पायलट कॅप्टन सवराजदीप सिंग, रुग्ण संजय कुमार (४१), अर्चना देवी आणि धुरु कुमार (परिचारिका), डॉ. विकास कुमार गुप्ता आणि सचिन कुमार मिश्रा यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
लतेहार जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या संजय कुमार (४१) या रुग्णाला घेऊन हवाई रुग्णवाहिका रांची येथून दिल्लीला जात होती. संजय कुमार आगीत ६५ टक्के भाजले होते. त्यांच्यावर रांचीच्या देवकमल रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, चांगले उपचार मिळावेत यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी एअर अॅम्ब्युलन्सद्वारे संजय यांना दिल्लीला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता.















