महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षा पारदर्शक आणि ‘कॉपीमुक्त’ वातावरणात पार पाडण्यासाठी कंबर कसली असतानाच, विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीच्या गणिताच्या दोन्ही प्रश्नपत्रिका चक्क एका टेलिग्राम ग्रुपवर लीक झाल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारामुळे आता राज्य मंडळाच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहावीच्या गणित भाग-1 आणि भाग-2 चे पेपर परीक्षेच्या वेळेपूर्वीच एका सोशल मीडिया ग्रुपवर व्हायरल झाले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, गणित भाग-2 चा पेपर तर परीक्षेच्या 3 दिवस आधीच टेलिग्राम ग्रुपवर टाकण्यात आला होता. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी या व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकांची मूळ प्रश्नपत्रिकेशी पडताळणी केली, तेव्हा त्या तंतोतंत जुळल्याचे स्पष्ट झाले. यामुळे हा पेपरफुटीचाच प्रकार असल्याचे सिद्ध झाले आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पुणे विभागीय मंडळाने तातडीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी संबंधित टेलिग्राम ग्रुपचा ॲडमिन आणि त्यातील सदस्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सायबर पोलिसांच्या मदतीने आता हा पेपर नेमका कोठून आणि कसा लीक झाला, याचा तांत्रिक तपास केला जात आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मुख्य सूत्रधाराला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
एकीकडे पुण्यात हायटेक पद्धतीने पेपर लीक होत असताना, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी केंद्रावर कॉपीचा जुनाच प्रकार समोर आला आहे. बारावीच्या परीक्षेदरम्यान नातेवाईकांनी खिडकीतून दगडात गुंडाळून ‘चीट’ फेकत विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष खबरदारी घेऊनही ग्रामीण भागात असे प्रकार सुरूच आहेत. या प्रकरणी दोन दिवसांपूर्वीच 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, तरीही परिस्थिती बदललेली नाही. राज्यात नागपूरनंतर आता पुण्यातही पेपरफुटीचे प्रकरण गाजत असल्याने प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नागपुरातील पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील या घटनेमुळे बोर्डाच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.














