गॅस टंचाईमुळे उद्योगांवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शहरातील उद्योजकांची बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे ऑइल आणि गॅस पुरवठा खंडित झाल्यास काय परिणाम होऊ शकतो? यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. गॅस संदर्भात कोणी गैरकारभार करत असल्याचं आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सामंतांनी दिला. तसेच गॅस पुरवठ्याशी संबंधित सर्व कंपन्यांची विस्तारित बैठक मुंबईत घेण्याची गरज असून याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
अद्याप उद्योगांकडे गॅसचा साठा शिल्लक असल्याची माहिती उद्योजकांनी दिली आहे. काही उद्योगांकडे तीन, सहा तर काहींकडे 12 दिवसांपर्यंतचा गॅस साठा उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांनी गॅस कंपन्यांसोबत बैठक घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्याचंही उद्योगमंत्र्यांनी सांगितलं. तसेच, स्थानिक उद्योजकांना सोबत घेऊन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार असून उद्योगांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आपली भूमिका मांडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्योगांना कुठल्याही प्रकारे नुकसान होऊ नये, ही सरकारची भूमिका असल्याचंही त्यांनी सांगितलं.
गुरुवारी सायंकाळी उद्योजकांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. तसेच, कोणाकडे किती गॅस साठा आहे, याची माहितीही घेण्यात आली. गॅस कंपन्यांसोबतही बैठक घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, गॅस टंचाईबाबत काही अफवा पसरवल्या जात असून कोणी गैरकृत्य करत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिला.
उद्योगांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी काही उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. ज्यांनी घेतलेल्या जागेचा वापर केलेला नाही, अशा जागा परत घेण्याचा निर्णय वर्षभरापूर्वीच घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं.
उद्योजकांना कर्ज सवलती मिळाव्यात यासाठी बँकांच्या चेअरमनसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी, अशी विनंती आपण करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये 8 एकर जमीन संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं याठिकाणी विविध उद्योग कार्यरत आहेत. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेतल्याचं त्यांनी सांगितलं. एक्सपोर्टसंदर्भात तसेच बँकिंग विषयात उद्योजकांना काहीप्रमाणात दिलासा मिळायला हवा, अशी भूमिका उदय सामंत यांनी व्यक्त केली.















