लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती 49 हजार रुपयांपर्यंत खर्च करू शकते. गुजरातमध्ये सगळे अधिकार बाजार समितीला आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी आम्ही शासनाकडे प्रयत्न करू. बाजारात आवक कमी झाली आहे. त्याबाबत मार्केट कमिटीनेच निर्णय घ्यावा लागेल. बाजार बंद होणे हा महत्त्वाचा मुद्दा असून याबाबत बाजार समितीने कडक धोरण तयार केले पाहिजे. क्षुल्लक कारणावरून बाजार बंद होता कामा नये, अशी सूचना माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी केली.
आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शनिवारी सभापती जगदीश बावणे व सचिव अरविंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर येथील विकसित झालेल्या कामाची पाहणी करून उर्वरित कामांचा आढावा घेतला. तसेच अमोल रमेश बच्चेवार यांच्या अमोल उद्योग दुकानास भेट देऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधला. तसेच आडत व्यापारी असोसिएशनच्या कार्यालयाला भेट देऊन अडत्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याबाबत संबंधितांना तात्काळ सूचना केल्या.
यावेळी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे महापौर जयश्री सोनकांबळे उपमहापौर एडवोकेट स्नेहल उटगे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंखे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, मनपा गटनेते विजयकुमार साबदे, ट्वेंटीवन शुगरचे व्हा.चेअरमन विजय देशमुख, रमेश बच्चेवार, अमोल बच्चेवार, अतिश बच्चेवार, नगरसेवक गिरीश ब्याळे, नगरसेविका मंजुषा अग्रवाल, नगरसेवक अभिषेक पतंगे, नगरसेवक मंगेश सोनकांबळे, बालाप्रसाद बिदादा, सुधीर गोजमगुंडे, भालचंद्र सोनकांबळे, गट्टूशेठ अग्रवाल, नितीन कलंत्री, लालूशेठ कचोरिया, बी.एस.पवार, तुळशीराम गंभीरे, प्रल्हाद सुरवसे, चंदूशेठ कचोरिया, आनंद मालू, श्रीकांत ठोंबरे, सुधीर बोरुळे, आबेद गोलंदाज, परीक्षित देशपांडे, असलम बागवान आदिसह लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक, काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, खरेदीदार, आडते, व्यापारी, हमाल मापाडी, गाडीवान, बच्चेवार कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते.
अमित देशमुख म्हणाले की, भाजीपाला, बटाटा, कांदा मार्केटच्या सोयी सुविधा विकसित आपण टप्प्याटप्प्याने करू. वाहतुकीच्या कोंडीबाबतही मनपाने व्यापक बैठक घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या एकमेव महापौर जयश्री सोनकांबळे आहेत. लातूर मनपाकडील सर्व कामे व्यापाऱ्यांची जलद गतीने होतील. बाजारपेठ स्थलांतराचा प्रश्न रेंगाळला आहे. उद्योग मंत्री याची मी भेट घेतली आहे. पंधरा दिवसात याबाबत अंतिम निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.














