शिर्डीतील साईबाबा मंदिरात श्रीरामनवमी उत्सवाची दणक्यात सुरुवात झाली आहे. आज बुधवारी (25 मार्च) पहाटे काकड आरतीनं या उत्सवाला सुरुवात झाली. उद्या गुरुवारी मुख्य दिवस असल्यानं देशभरातून भाविक मोठ्या संख्येनं पालख्या घेऊन शिर्डीत दाखल होत आहेत. विशेषतः मुंबईहून येणाऱ्या पालख्यांची परंपरा या उत्सवाशी घट्ट जोडलेली आहे. शिर्डीतील श्रीरामनवमी उत्सवाची परंपरा शके 1833 (इ.स. 1911) पासून सुरू झाली. सुरुवातीला हा उत्सव उरूस म्हणून साजरा होत होता. साईभक्त भिष्म यांनी साईबाबांना विनंती करून या उरुसाला श्रीरामनवमी उत्सवाचं स्वरूप दिलं, असं सांगितलं जातं. त्यानंतर साईबाबांच्या आज्ञेनं भिष्म आणि गोपाळराव गुंड यांनी या उत्सवाची औपचारिक सुरुवात केली. तेव्हापासून ही परंपरा अखंड सुरू आहे.
श्रीरामनवमी उत्सवाच्या पहिल्या दिवशी काय?
उत्सवाच्या पहिल्या दिवशी काकड आरतीनंतर साईंची पोथी, विणा आणि प्रतिमा घेऊन द्वारकामाई पर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर द्वारकामाई येथे अखंड साईचरित्र पारायणास प्रारंभ झाला. या मिरवणुकीत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी विणा, तर प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले आणि अतुल वाघ यांनी साईंची प्रतिमा वाहून सहभाग घेतला. तसेच मंदिर विभाग प्रमुख, जनसंपर्क अधिकारी, पुजारी, ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनें उपस्थित होते.
साईबाबा मंदिरासह परिसरात आकर्षक सजावट :
श्रीरामनवमी उत्सवानिमित्त मुंबई येथील साई द्वारकामाई मंडळातर्फे साईबाबा मंदिरासह परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. साईबाबा मंदिर परिसरात उभारण्यात आलेला श्री मयूरद्वार देखावा भाविकांचं विशेष लक्ष वेधून घेत असून तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. साईबाबा मंदिराच्या चार नंबर प्रवेशद्वाराजवळ तब्बल 50 फूट उंच श्री साई मयूरद्वार देखावा उभारण्यात आला आहे. सोबतच, बेंगळुरू येथील दानशूर साईभक्त व्यंकटा सुब्रमणियन यांच्या देणगीतून साईबाबा समाधी मंदिर तसेच द्वारकामाई मंदिर, गुरूस्थान, चावडी, दत्त मंदिर आणि इतर मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. विविधरंगी आणि सुगंधी फुलांनी सजलेला मंदिर परिसर अधिकच प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण निर्माण करत आहे.














